Star Pravah New Serial : छोट्या पडद्यावर येत्या काही महिन्यांत नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. टीआरपीच्या शर्यतीमधलं आपलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने जुन्या मालिका बंद करून गेल्या महिन्याभरात ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. आता वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होणार आहे. या नव्या मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या गणपती महोत्सवाला या दोघांनी उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच या दोघांची एकत्र नवीन मालिका सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या बहुप्रतीक्षित मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हेही वाचा : Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

शर्वरीने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या ‘कुण्या राजाची गं तू राणी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे अभिनेत्रीचं वाहिनीवर लगेचच पुनरागमन होणार आहे. प्रोमोमध्ये एका भल्यामोठ्या फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या कंपनीत साध्याभोळ्या मुलीची एन्ट्री होत असल्याचं पाहायला मिळतं. तिचा कंपनीत पहिलाच दिवस असतो, त्यात झालेला उशीर म्हणून ती धावत-पळत येत असते आणि जिन्यात पाय अडकून पडते. यावेळी तिच्या हाताला दुखापत होते. मालिकेत शर्वरी याच ईश्वरी देसाईचं पात्र साकारणार आहे.

मालिकेचा नायक कंपनीचा मालक असतो. तो ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी बनवलेले सगळे ड्रेस रिजेक्ट करत असतो. एवढ्यात ईश्वरी तिथे येते…ऑफिसचा पहिलाच दिवस असला तरीही ती हाताला दुखापत झाल्याने उशीर झाल्याचं त्याला सांगते. यावर नायक जवळ येतो आणि तिच्या हातावरची जखम कर्मचाऱ्यांना दाखवून मला अशा रंगाचा ब्लड रेड रंग ड्रेससाठी हवाय असं सर्वांना सांगतो. या अर्णवचं पात्र मालिकेत अभिजीत आमकर साकारत आहे. यावर ईश्वरी म्हणते, “माणूस आहे की राक्षस” हे ऐकताच अर्णव पुन्हा मागे फिरून तिला सांगतो, “मला आवडलंय हे नाव राक्षस” याच ईश्वरी आणि अर्णवची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : “एक पक्ष १५०० देतोय, दुसरा ३ हजार देणार, पण…”, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश ओक यांनी विचारले दोन ‘भाबडे’ प्रश्न; पोस्ट चर्चेत

‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका येत्या २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. आता नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘अबोली’ मालिकेची वेळ बदलणार की मालिका संपणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and abhijit amkar watch new promo sva 00