Star Pravah Parivaar Puraskar 2025 : छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, अभिनेते व निर्माते महेश कोठारे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात आपल्या आवडत्या कलाकारांना पुरस्कार मिळाला की नाही? याची उत्सुकता सध्या सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या १६ मार्चला टीव्हीवर करण्यात येणार आहे. याचवेळी प्रेक्षकांना विजयी कलाकारांची नावं समजतील. पण, त्याआधीच सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंमुळे काही पुरस्कारांचे मानकरी आधीच प्रेक्षकांसमोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्वरदा ठिगळेने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला यंदा ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’चा पुरस्कार मिळाल्याचं प्रेक्षकांसमोर आलं होतं. पण, आता सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार कोणी जिंकलाय हे पुरस्कार सोहळ्याच्या प्रक्षेपणाआधीच उघड झालं आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या एकूण १४ मालिका ऑन एअर आहेत. आता यापैकी सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी होण्याचा बहुमान कोणाला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर एका व्हायरल फोटोतून, यंदा ‘मुरांबा’ मालिकेतील अक्षय-रमाने ‘सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी’ या पुरस्कारावर आपलं नाव कोरल्याचं समोर आलं आहे.
‘मुरांबा’ मालिकेत अक्षयची प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर साकारत आहे. तर, रमाच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर झळकत आहे. पुरस्कार सोहळा पार पडल्यावर शिवानीने रेड कार्पेटवर पोझ देत तिचा पुरस्कार चाहत्यांना दाखवला. यामध्ये शिवानीच्या हातात ‘सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी’ ही ट्रॉफी असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला प्रक्षेपित करण्यात येणार आहे. आता १४ मालिकांमध्ये यंदा ‘महाराष्ट्राची महामालिका’ होण्याचा बहुमान कोण मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.