Star Pravah Parivaar Puraskar 2025 : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. येत्या १६ मार्चला या सोहळ्याचं टेलिव्हिजनवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष आहे. यानिमित्ताने अनेक पाहुण्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. याशिवाय काही जुन्या मालिकांमधले कलाकार देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

यंदा पार पडणाऱ्या सोहळ्यामध्ये आणखी काय खास असणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली असतानाच आता वाहिनीकडून एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात नृत्यांगणा गौतमी पाटील देखील तिचा जबरदस्त परफॉर्मन्स सादर करणार आहे. “गौतमी पाटीलच्या मोहक अदांनी सोहळ्याला चढणार रंगत…” असं कॅप्शन देत वाहिनीने गौतमीच्या एन्ट्रीचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

गौतमी तिचं प्रसिद्ध गाणं ‘सबसे कातील मी गौतमी पाटील’ या गाण्यावर ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात जबरदस्त एनर्जीसह डान्स करताना दिसणार आहे. गौतमीच्या एन्ट्रीनंतर सगळ्याच कलाकारांनी एकत्र जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे. “सोहळा जगावेगळा, तरीही मराठमोळा…नक्की यायचं हं” असं आवाहन गौतमीने या प्रोमोतून प्रेक्षकांना केलं आहे.

यापूर्वी गौतमी ‘स्टार प्रवाह’चा लोकप्रिय शो ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये देखील सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिची ठसकेबाज लावणी पाहायला मिळाली होती. आता गौतमी पुरस्कार सोहळ्यात थिरकताना दिसणार आहे.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार सोहळा १६ मार्च संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर यंदा पुरस्काराच्या शर्यतीत ‘साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘शुभविवाह’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘उदे गं अंबे’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग!’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘अबोली’ अशा एकूण १४ मालिका असणार आहेत. आता यंदाच्या सोहळ्यात या १४ मालिकांपैकी कोणती मालिका बाजी मारणार? सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री होण्याचा बहुमान कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader