Aai Kuthe Kay Karte: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रियतेचं शिखर गाठणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचा प्रवास आता थांबणार आहे. साडे चार वर्षांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यादरम्यान मालिकेत अनेक ट्विस्ट आले. काही ट्विस्टने टीआरपी वाढवला. पण काही ट्विस्ट प्रेक्षकांसाठी रटाळवाणे होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ‘आई कुठे काय करते मालिका बंद करा’, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटतं होत्या.

तसंच काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ची आगामी नवी मालिका ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ याची प्रसारित होण्याची तारीख व वेळ निश्चित झाली. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. सध्या याच वेळेत ‘आई कुठे काय करते’ मालिका सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून ‘आई कुठे काय करते’ मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता हे मात्र निश्चित झालं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: अविनाशने शर्टलेस होऊन ईशाबरोबर केला डान्स, तर करणवीर चुम दरांगबरोबर रोमँटिक गाण्यावर थिरकला, पाहा व्हिडीओ

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याच पोस्टच्या माध्यमातून ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं मिलिंद गवळी यांनी सांगितलं आहे. या पोस्टमध्ये मालिकेच्या जुन्या आठवणींसह सहाय्यक कलाकारांचे मिलिंद यांनी आभार मानले आहेत.

मिलिंद गवळींची पोस्ट वाचा…

मी मिलिंद गवळी, स्टार प्रवाह परिवार आणि Director’s Kut Production कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय, शांतीपूर्ण, आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची ‘आई कुठे काय करते’ ही ‘स्टार प्रवाह’वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात आणि लॉकडाऊनच्या काळात ‘स्टार प्रवाह’ने ‘आई कुठे काय करते’चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा मालिका पाहिली. ती इतकी भावली की अक्षरश: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं, आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि ‘स्टार प्रवाह’चे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं. ‘स्टार प्रवाह’ने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते ‘होऊ दे धिंगाणा’ किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.

DKPचे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो. त्या वास्तूमध्ये आम्ही ४५ ते ५० वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम, पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये. असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशनवर केले आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही.

नमिता वर्तक यांची कथा, पटकथा खूप भारी होती. या मालिकेचे संवाद छान असायचे. प्रेक्षक कान देऊन ऐकायचे. ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते. दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती आणि विशेष म्हणजे कलाकार, या मालिकेमध्ये एकापेक्षा एक कलाकार होते. आपापल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश, इशा, अनघा, विमल, शेखर-विशाखा आरोही-गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी या सर्वांचा आभारी आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनाने ‘या’ दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये, रेशन वाटपाचा अधिकार असणार आता यांच्या हातात

दरम्यान, अभिनेते मिलिंद गवळींच्या पोस्टवर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आम्हाला मालिकेची आठवण येईल”, “आम्हाला प्रत्येक पात्राची आठवण येईल”, “मस्त लिहिलं आहे”. “खूप छान”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.