Star Pravah Awards : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कोणती मालिका बाजी मारणार याची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची पसंती मिळवून ‘ठरलं तर मग’ मालिका, सलग दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली आहे. तर, ‘सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका’ होण्याचा बहुमान ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेने मिळवला आहे. याव्यतिरिक्त, सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ‘आई-बाबा’, ‘सासू-सासरे’, ‘पती-पत्नी’ असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यंदा ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’ हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम कला आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता या दोन नायिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला खरे ही भूमिका अभिनेत्री ईशा केसकर साकारत आहे. तर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता कोळीच्या रुपात काही महिन्यांपूर्वीच स्वरदा ठिगळेची एन्ट्री झालेली आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरू झाल्यापासून अभिनेत्री तेजश्री प्रधान यामध्ये मुख्य भूमिका साकारत होती. ही मालिका सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर जानेवारी २०२५ मध्ये म्हणजेच दोन महिने आधीच तेजश्री प्रधानने ही मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं आणि तिच्या जागी मालिकेत मुक्ताच्या प्रमुख भूमिकेसाठी स्वरदा ठिगळेची वर्णी लागली.
आता नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड शोमध्ये ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’ हा पुरस्कार मुक्ता या पात्रासाठी जाहीर करण्यात आला. विजेत्यांचं नाव जाहीर होताच मालिकेत सध्या मुक्ताची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री स्वरदाने हा अवॉर्ड स्वीकारला. यावरून मालिकेचे प्रेक्षक आणि तेजश्रीचे चाहते नाराज झाले आहेत. यासंदर्भात असंख्य कमेंट्स या पोस्टवर करण्यात आल्या आहेत.
“हा पुरस्कार तेजश्री प्रधानला द्यायला हवा होता”, “खरोखर तेजश्री प्रधान या पुरस्कारासाठी खरी पात्र आहे”, “स्टार प्रवाह…तेजश्रीने वर्षभर यासाठी मेहनत घेतली होती”, “जुनी मुक्ता तिचा आहे हा पुरस्कार”, “सगळं चुकीचं आहे” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. तर, अनेक युजर्सनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, “सर्वांचा आदर आहे मला…पण, हा पुरस्कार तेजश्रीचा आहे” असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर याचा परिणाम ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीआरपीवर देखील दिसून आला. यामुळे मालिकेची रात्री आठ वाजताची वेळ बदलून, ही मालिका सध्या सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाते.