Star Pravah Premachi Goshta : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १ एप्रिलपासून मोठा बदल होणार आहे. वाहिनीने दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने जानेवारी महिन्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडली. तेजश्रीच्या एक्झिटनंतर या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वरदा ठिगळेची वर्णी लागली. ही मालिका गेली दीड वर्षे रात्री ८ वाजता प्रसारित केली जायची. मात्र, तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’च्या टीआरपीला मोठा फटका बसला. परिणामी, वाहिनीने या मालिकेचा आठचा स्लॉट बदलून ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित होईल अशी घोषणा केली.
मात्र, आता महिन्याभरातच पुन्हा एकदा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर मालिकेला मोठा फटका बसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.
१ एप्रिलपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दोन महत्त्वाचे बदल करण्यात येतील. शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाईल. सध्या ही मालिका दुपारी १ वाजता प्रक्षेपित केली जाते.
तर, साडेसहाला प्रसारित होणारी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता दुपारी १ वाजता प्रक्षेपित केली जाईल. तेजश्रीच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे प्राइम स्लॉट टीआरपीच्या दृष्टीकोनातून बदलण्यात आले आहेत.
१ एप्रिलपासून ‘अशी’ असेल नवीन वेळ
- प्रेमाची गोष्ट – दुपारी १ वाजता
- साधी माणसं – सायंकाळी ६:३० वाजता

यासंदर्भातील अधिकृत माहिती देणारे प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीवर शेअर करण्यात आले आहेत. “जुन्या मुक्ताला परत आणा.. बघा प्राईम टाइमचा स्लॉट मिळेल”, “तेजश्री ताई नसल्यापासून ही मालिका आवडत नाही”, “जेव्हापासून मुक्ता बदलली आहे तेव्हापासून ही मालिका आवडत नाही”, “ही मालिका आता बोअरिंग झालीये”, “जुन्या मुक्ताला पुन्हा आणा” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.