१६ मार्चला स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा (Star Pravah Purskar) मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, निशिगंथा वाड, दिग्दर्शक महेश कोठारे, निर्माते-अभिनेते आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर यासंह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीने सोहळ्याची रंगत आणखी वाढली. या रंगतदार सोहळ्याची शोभा आणखी वाढवण्यासाठी बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितनेदेखील (Madhuri Dixit) खास उपस्थिती लावली होती.
स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात अनेक मालिकांना व मालिकेच्या कलाकारांना पारितोषिकं मिळाली. शिवाय अनेक कलाकारांची माधुरी दीक्षितला भेटण्याची इच्छादेखील पूर्ण झाली. माधुरी दीक्षितच्या याच खास भेटीबद्दल ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) मालिकेमधील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) खास पोस्ट शेअर केली आहे. माधुरी दीक्षितबरोबर एकत्र स्टेज शेअर करण्याचा आनंद अपूर्वाने तिच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. अपूर्वाने माधुरी दीक्षितबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसह तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये अपूर्वाने असं म्हटलं आहे की, “हो हो, मी ‘धकधक गर्ल’ला भेटले. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ मध्ये मला दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षितबरोबर स्टेज शेअर करण्याचं सौभाग्य मिळालं आणि मी अजूनही तो क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यापासून काही फूट अंतरावर तिला प्रत्यक्षात पाहणे हे एखाद्या जादूपेक्षा काही कमी नव्हते. तिचे सौंदर्य, तिची प्रतिभा इतकी मनमोहक होती की, मी काही क्षणांसाठी पूर्णपणे स्तब्ध झाली होती. मी नक्की कुठे आहे हेच मी विसरून गेली होती”.
यापुढे तिने म्हटलं आहे की, “ती सहजतेने हालचाल करताना, तिचा प्रत्येक हावभाव आणि तिची प्रत्येक कृती ती एक शाश्वत तारा का आहे? याची आठवण करून देत होता. वेळ जणू काही थांबला होता आणि मी माझ्या डोळ्यांसमोर एक स्वप्न उलगडताना पाहत होते. अखेर मग तो क्षण आला ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. ती आमच्यासह नाचत होती. एक एक पाऊल टाकत होती आणि आम्ही तिची नक्कल करत होतो. तेव्हा मला खूपच आनंद झाला”.
यानंतर अपूर्वाने या पोस्टमध्ये असं म्हटलं की, “मी तिला लहानपणी पाहत, तिची गाणी सादर करत मोठी झाली होती आणि आता मी तिच्याबरोबर एकत्र स्टेज शेअर करत होती. तिच्या उपस्थितीत नाचत होती. हे असे क्षण आहेत जे मला वाटते की, मी खरोखरच जिंकले आहेत. या सुवर्णसंधीसाठी मी स्टार प्रवाहचे आभार मानते. अभिनेत्री होण्याचे हे फायदे आहेत, ज्या स्वप्नांची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल ती पूर्ण होतात आणि ती स्वप्ने तुम्हाला प्रत्यक्षात जगता येतात. मला माझे काम खूप आवडते आणि आज मी जिथे आहे तिथे असण्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते”.