कौतुक हे कोणत्याही कलाकाराला हवंहवंसच असतं. तेच कौतुक जर पुरस्काराच्या रुपात मिळालं तर सोन्याहून पिवळं. प्रत्येक पुरस्कार हा कलाकारासाठी शाबासकीची थाप असते, त्यामुळे असे हे पुरस्कार मिळण्यासाठी कलाकार मंडळीही अपार मेहनत घेत असतात. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा ‘स्टार प्रवाह पुरस्कार’ (Star Pravah Purskar) हा सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात वाहिनीच्या अनेक कलाकारांना व मालिकांना पुरस्कार मिळाले. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री समृद्धी केळकरला (Samruddhi Kelkar) ‘सर्वोत्कृष्ट निवेदक’ म्हणून पुरस्कार मिळाला.
समृद्धी केळकरची इन्स्टाग्राम पोस्ट
याबद्दल समृद्धीने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मालिका संपल्यावर लगेच एका डान्स शोचं निवेदन करण्याची संधी खूप कमी जणांना मिळते, ती संधी मला ‘मी सुपरस्टार’ या शोसाठी मिळाली. नृत्य माझा जिव्हाळ्याचा विषय… पण, निवेदन म्हणजे कधीच न केलेली गोष्ट… सुरुवातीला भयंकर टेन्शन आणि धाकधूक… पण नॉन-फिक्शनच्या अख्ख्या टीमने खूप पाठिंबा दिला. सांभाळून घेतलं आणि म्हणून मी माझं काम लीलया पार पाडू शकले.”
समृद्धी केळकरने मानले प्रेक्षकांचे आभार
यापुढे समृद्धीने असं म्हटलं की, “ज्या रंगमंचावर स्पर्धक म्हणून सुरुवात केली होती, त्याच रंगमंचावर निवेदन करून आज त्याचा पुरस्कार स्वीकारतानाच्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत आणि अर्थातच या कार्यक्रमाचे दोन्ही पर्वांचे निवेदन मी करू शकले ते मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे, त्यांच्या प्रेमामुळे… खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम राहूद्यात.”
समृद्धी केळकरवर कौतुकाचा वर्षाव
यापुढे समृद्धीने तिला निवेदनाची संधी देणाऱ्या सर्वांचे आभार मानत म्हटलं आहे की, “माझ्यावर विश्वास दाखवून एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलीत, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.” या पोस्टखाली कमेंट्समध्ये समीर चौघुले, सुयश टिळक, फुलवा खामकर यांसाख्या अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “खूप खूप अभिनंदन”, “शुभेच्छा” अशा कमेंट्सद्वारे तिचं ‘सर्वोत्कृष्ट निवेदक’ या पुरस्काराबद्दल कौतुकही केलं आहे.
समृद्धी केळकरच्या कामाबद्दल…
दरम्यान, समृद्धीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिला ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने साकारलेली ‘किर्ती’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय ‘ढोलकीच्या तालावर’ आणि ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतसुद्धा समृद्धी पाहायला मिळाली होती. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने समृद्धीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.