आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मालिकाविश्वातील लोकप्रिय नायकाचं हे स्वप्न येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्यावर्षी १८ मार्चला ‘साधी माणसं’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं. यामध्ये अभिनेता आकाश नलावडे आणि अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आकाशने वैयक्तिक आयुष्यातील एक खास बातमी नुकतीच चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे सध्या गावी त्याचं ‘ड्रीम होम’ बांधत आहे. सध्या त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू असून, याचा व्हिडीओ अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने ‘Coming Soon’ असं लिहिलं आहे. यापुढे त्याने घराचा इमोजी दिला आहे. यावरून लवकरच हे घर तयार होईल असं आकाशला सुचित करायचं आहे.
याशिवाय अभिनेत्याने या पोस्टवर “होम, ड्रीम होम गोल्स, गावचं घर, गाव, अंडर कन्स्ट्रक्शन” असे हॅशटॅग दिले आहेत. यावरून आकाश व त्याचे कुटुंबीय हे घर गावी बांधत असल्याचं स्पष्ट होत आहे.
आकाश नलावडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने २०२२ मध्ये रुचिका धुरीसह साखरपुडा केला होता. यानंतर १८ मार्च २०२३ रोजी त्याने लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
अभिनेत्याने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत पश्या ही भूमिका साकारली होती. यानंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘साधी माणसं’ मालिकेत त्याला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. ही लोकप्रिय मालिका सध्या सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.