स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. या मालिकेमधील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. आता ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या मालिकेमध्ये पश्या हे पात्र साकारणारा अभिनेता आकाश नलावडे त्याच्या लग्नाच्या तयारीला लागला आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’मधील पश्या या भूमिकेमुळे आकाश नावारुपाला आला. या मालिकेमध्ये पश्याच्या पत्नीची भूमिका अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार साकारत आहे. पण खऱ्या आयुष्यात पश्याची अंजी कोण? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांनाही पडला असेल. तर आकाश रुचिका धुरीबरोबर लवकरच लग्न करणार आहे.
गेल्या वर्षी आकाश व रुचिकाचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता आकाश व रुचिकाच्या घरी लगीनघाई सुरू आहे. या दोघांनीही एकमेकांबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
आकाश साकारत असलेल्या पश्या या पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. आता त्याचं लग्न होणार म्हटल्यावर चाहते त्याचं अभिनंदन करत आहे. आकाश व रुचिकावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. आकाशची होणारी पत्नी अगदी सुंदर दिसते. आकाशचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.