सध्या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जुन्या मालिका बंद करून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. दर महिन्याला कोणती ना कोणती वाहिनी नव्या मालिकेची घोषणा करत आहे. टीआरपीसाठी वाहिन्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५मध्ये सातत्याने असणारी लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘स्टार प्रवाह’ लवकरच ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका २७ मेपासून रात्री १०.०० वाजता पाहायला मिळणार आहे. सध्या १०.०० वाजता सुरू असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. अभिनेता मंदार जाधव व अभिनेत्री गिरीजा प्रभूची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २७ मेपासून ११.०० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या ११.०० वाजता सुरू असलेली ‘पिंकीचा विजय असो’ मालिका ऑफ एअर होणार आहे.
याशिवाय अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका १७ जूनपासून सुरू होणार आहे. रात्री ९ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या या वेळेत सुरू असलेली आणि टीआरपीच्या यादीत टॉप-५मध्ये असलेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका ऑफ एअर होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
२ मे २०२२पासून सुरू झालेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मल्हार, मोनिका, वैदही, स्वरा, पिहू, निरंजन, क्षमा, विजय, विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. मालिकेतील ट्विस्टने तर प्रेक्षकांचा चांगलं खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत कधी दुसऱ्या स्थानावर, कधी तिसऱ्या स्थानावर तर कधी चौथ्या स्थानावर असायची. गेल्या आठवड्यातील टीआरपीच्या यादीतही ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका चौथ्या स्थानावर आहे. पण तरीही ‘स्टार प्रवाह’ने ही मालिका बंद करण्याचा मोठा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने आई-वडिलांना दिलं खास सरप्राइज, घेतला ‘सुवर्णरथ’
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, प्रिया मराठे, अवनी जोशी, अवनी तायवाडे, तेजस्विनी लोणारी, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे, शैलेश दातार, हार्दिक जोशी, अभिजीत केळकर, उषा नाईक असे अनेक तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. पण आता ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.