Star Pravah : सध्या सर्वत्र ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. येत्या १६ मार्चला हा सोहळा प्रक्षेपित केला जाणार आहे. दरवर्षी या सोहळ्यात प्रेक्षकांसाठी काही विशेष घोषणा केल्या जातात. विशेषत: या सोहळ्यादरम्यान नव्या मालिकांची झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली जाते. आता यावर्षीच्या सोहळ्यात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. त्याआधीच ‘स्टार प्रवाह’ने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत नवीन मालिका सुरू होणार असल्याची हिंट प्रेक्षकांना दिली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेद्वारे वाहिनीवर याआधी नायिकेच्या रुपात झळकलेली अभिनेत्री पुनरागमन करणार आहे. आता या नव्याकोऱ्या मालिकेत नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
“खास लोकाग्रहास्तव! ‘स्टार प्रवाह’वरील तुमची आवडती नायिका परत येतेय! एका नव्या कोऱ्या मालिकेत! ओळखा पाहू कोण?” असं कॅप्शन देत ‘स्टार प्रवाह’ने एका नायिकेचा ब्लर फोटो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. आता ही नायिका नेमकी कोण असेल याचा अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये वर्तवला आहे.
सुरुवातीला ब्लर फोटो पाहून ही नायिका सायली संजीव असल्याचा भास होतो, अशा कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, वाहिनीच्या कॅप्शनमध्ये आधी वाहिनीवर काम केलेली नायिका असं नमूद केलेलं आहे. त्यामुळे ही सायली संजीव नसून गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा प्रभू आहे असं एका नेटकऱ्याने कमेंट्समध्ये म्हटलं आहे. बहुतांश नेटकऱ्यांनी कमबॅक करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून गिरीजा प्रभू आहे असा अंदाज बांधला आहे.
अनेकांनी ही अभिनेत्री ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकर असेल असाही अंदाज व्यक्त केला आहे. समृद्धी आणि गिरीजा या दोघींनीही यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तर, काही नेटकऱ्यांनी तेजश्री प्रधान, ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम सरू म्हणजे नंदिता पाटकर, ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर या अभिनेत्रींची नावं कमेंट्समध्ये घेतली आहेत.
मात्र, सर्वाधिक कमेंट्स या गिरीजा प्रभूच्या नावाने आल्या आहेत. आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे. हे मालिकेची पहिली झलक समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे. नव्या मालिकेचा प्रोमो पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रदर्शित होऊ शकतो. आता ही नायिका नेमकी कोण आहे. हे जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.