Shubhvivah Fame Actor New Car : आपल्या हक्काचं घर आणि फिरण्यासाठी गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मालिकाविश्वात काम करणाऱ्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची नुकतीच स्वप्नपूर्ती झालेली आहे. या अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केली आहे.

‘फुलपाखरू’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच यशोमन आपटे. आजवर त्याने ‘फुलपाखरू’, ‘श्रीमंताघरची सून’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेता ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ मालिकेत आकाश महाजन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात यशोमन आपटेने मोठी भरारी घेत आता स्वत:ची गाडी घेतली आहे.

यशोमनने टाटा कर्व ही नवीन गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्याने आपल्या आई-बाबांच्या साथीने या नव्या गाडीची पूजा देखील केली. यशोमनने ‘माय न्यू बेबी’ म्हणत नव्या कारची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.

‘फायनान्शियल एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार यशोमनने खरेदी केलेल्या टाटा कर्व कारची किंमत सध्या १० ते १९ लाखांच्या ( एक्स शोरुम ) घरात आहे. तसेच, या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत ९.९९ लाख रुपये आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून यशोमनवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

यशोमन आपटेला ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्याने हृता दुर्गुळे बरोबर काम केलं होतं. सध्या यशोमन ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ मालिकेत काम करून घेतो. गेली दोन वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. अभिनयाप्रमाणेच त्याला गाण्याची सुद्धा तेवढीच आवड आहे.

दरम्यान, आकाश नलावडे, प्रथमेश परब, अभिषेक रहाळकर, चेतन वडनेरे, शशांक केतकर, विशाखा सुभेदार, ऐश्वर्या नारकर, विवेक सांगळे, सानिका काशीकर, किशोरी अंबिये अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत यशोमनच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.