छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. टीआरपीत सातत्य राखण्यासाठी दिग्दर्शक-निर्माते नेहमीच मालिकेच्या कथानकात नवनवे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करतात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका १७ ऑगस्ट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून नुकताच या मालिकेने ९०० भागांचा टप्पा गाठला आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील खलनायिका शालिनी जयदीप-गौरीचा खून करुन त्यांचा शेवट करणार असा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मालिका आज जवळपास ३ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत आतापर्यंत शालिनीने गौरी-जयदीपच्या विरोधात अनेक कारस्थानं रचली परंतु, यात तिला यश मिळालं नाही.
अखेर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये “मी गौरी-जयदीपच्या प्रेमाचा शेवट करणार” असं शालिनी रागात म्हणताना दिसत आहे. यात तिने दोघांनाही एका जंगलात झाडाला बांधून ठेवलं आहे. शालिनी या प्रोमोमध्ये जयदीपवर तलवारीने वार करत असल्याचं दिसत आहे. मालिकेचा हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच वैतागले आहेत.
हेही वाचा : ‘हे’ आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं अभिनयाव्यतिरिक्त छुपं टॅलेंट, म्हणाली, “मला उत्तम…”

नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी “एकदाचा कर बाई त्यांचा शेवट…आणि संपवा हा कार्यक्रम”, “या मालिकेचा शेवट कधी करताय?”, “अरे यांना आवरा कोणीतरी…”, “एकदम वाईट मालिका”, अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.