स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ य मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील अनेक कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले. या मालिकेत पल्लवी शिर्सेकर हे पात्र अभिनेत्री पूजा बिरारीने साकारलं होतं. या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच तिने भावूक पोस्ट शेअर केली आहे.
पूजा बिरारी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच पूजाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. पूजाने या व्हिडीओत ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतील काही दृश्य शेअर केली आहेत. या व्हिडीओला तिने भावूक कॅप्शन दिले आहेत.
आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती?
पूजा बिरारीची पोस्ट
“एकवेळ पूजा ला ओ देणार नाही पण पल्लु किंवा पल्लवी या हाकेला आपसूकच माझ्या तोंडून ओ येत होतं.. “पल्लवी” ही भूमिका साकारताना खरंतर पल्लवी ने पूजाला जगायला शिकवलं..
पल्लवीमुळे खरंतर पूजाला ओळख मिळाली त्यामुळे पल्लवी ही कायम स्वरुपी आयुष्यभर माझ्यासोबत असणार आहे..
खूप काही शिकायला मिळाले आहे तिच्या कडून..आणि आयुष्यभर कदाचित पल्लु किंवा पल्लवी ह्या हाकेला मी ओ देत राहीन.पल्लवी भास्कर शिर्सेकर पासून सुरू झालेला हा प्रवास पल्लवी शांतनू सूर्यवंशी होऊन कुटुंबाला सांभाळत, अभ्यास सांभाळत, स्त्रियांना स्वभिमनाने जगायला शिकवत आणि कुटुंबासाठी न्याय मिळवत आज इथे येऊन थांबला आहे… संपला आहे असं मी म्हणणारच नाही..
खूप खूप मजा आली आहे मागच्या दोन वर्षात मला.. आठवणींच्या वादळात सापडलेल्या माझ्या मनाच्या गलबताला जितकं मांडता येतंय त्याहून खूप अधिक सांगायचंय.. पण आता माझ्या शब्दांना विराम देते.. आणि तुम्ही बरसवलेल्या प्रेमाला घट्ट मिठी मारून आपली रजा घेते.. धन्यवाद..!!!” असे पल्लवी बिरारीने म्हटले आहे.
दरम्यान ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेच्या जागी आता एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असे या मालिकेचे नाव आहे. यात अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘लग्न झालं की मुलीचा माहेरशी असलेला संबंध खरंच संपतो..?’ अशा आशयाची ही मालिका असणार आहे. येत्या ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.