छोट्या पडद्यावरच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच तर मालिकेतले सुख-दु:खाचे प्रसंग प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. मनोरंजनाच्या प्रवाहातला असाच एक अनोखा प्रयोग ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तीन तासांच्या या महासंगीत सोहळ्यात ३३ कलाकारांची फौज दिसणार आहे.
अर्जुन, सायली, नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्यासह दोन्ही मालिकेतील सर्व मुख्य कलाकार या महासंगीत सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तीन तासांचा हा अभूतपूर्व सोहळा साकारण्यासाठी १५० पेक्षा जास्त तंज्ञत्र मंडळी तीन दिवस मेहनत घेत होते. शूटिंग वेळेत पूर्ण व्हावं यासाठी दोन हुबेहूब दिसणाऱ्या सेटची निर्मिती करण्यात आली. कलादिग्दर्शक तृप्ती ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकसारखे दिसणार दोन सेट उभारले गेले. ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीच हा तीन तासांचा महासंगीत सोहळा शूट केला आहे. याविषयी सांगताना सचिन गोखले म्हणाले, “माझ्यासाठी खरंच हे आव्हानात्मक होतं. ‘स्टार प्रवाह’ने माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यासाठी आभार. ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांबरोबर पहिल्या दिवसापासून शूट करतोय मात्र, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या कलाकारांबरोबर या महासंगीतच्या निमित्ताने पहिल्यांदा काम केलं. प्रत्येक पात्र समजून घेत शूटिंग करत होतो. तीन तासांचा एपिसोड जवळपास तीन दिवस शूट करत होतो. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे.”
तीन तासांचा हा महासंगीत सोहळा उभा करणं हे सोपं नव्हतं. या आव्हानाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “दोन मालिका ज्यांची स्वतंत्र कथानकं सुरु आहेत त्या एकत्र गुंफून त्याची एक गोष्ट बांधणं आणि त्यात तीन तासांचा भक्कम भाग बनवणं आणि ३३ कलाकार असणं हे आव्हानात्मक होतं. ‘स्टार प्रवाह’च्या संपूर्ण टीमने मिळून हे पार पाडलं आहे. रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल यात काही शंका नाही. जितकी मेहनत करतो तेवढा रसिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे असे नवनवे प्रयोग करताना फार आनंद होतो. माझी खात्री आहे की हा महासंगीत विशेष भाग प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करेल.”
सलग तीन दिवस महासंगीत सोहळ्याचं शूटिंग सुरु होतं. सेटवर सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडाव्यात यासाठी निर्माते सोहम आणि सुचित्रा आदेश बांदेकर आवर्जून उपस्थित होते. मालिकेचं कथानक हा मालिकेचा आत्मा असतो. त्यामुळे लेखकाच्या खांद्यावर विशेष जबाबदारी असते. त्यात दोन्ही मालिकांच्या कथेला योग्य न्याय देत कथा बांधणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट. लेखिका शिल्पा नवलकर आणि अश्विनी अंगाळ यांनी या महासंगीत सोहळ्याची कथा अतिशय सुबकतेने गुंफली आहे.
महासंगीत सोहळ्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागर, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील तेजस आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अर्थात जयदीप-गौरीचा देखील खास परफॉर्मन्स असणार आहे. हा सोहळा ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रक्षेपित केला जाणार आहे.