‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली गिरीजा प्रभूची मुख्य भूमिका असलेली नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ असं गिरीजाच्या नव्या मालिकेचं नाव असून यामध्ये तिच्याशिवाय वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर महत्त्वाच्या झळकणार आहेत. तसंच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनेरे यांची प्रमुख भूमिका असलेली दुसरी नवी मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अद्याप दुसऱ्या नव्या मालिकेची घोषणा झालेली नाही. पण, दोन नव्या मालिका येत असल्यामुळे कोणत्या जुन्या मालिका ऑफ एअर होणार याची चर्चा सुरू आहे.
महेश कोठारे यांच्या प्रोडक्शनची मालिका ‘उदे गं अंबे’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण, आता ही मालिका निरोप घेणार नसून अल्पविराम घेणार आहे. ११ ऑक्टोबर २०२४पासून सुरू झालेल्या ‘उदे गं अंबे’ या पौराणिक मालिकेत साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि इतिहास या मालिकेतून मांडण्यात आला आहे. मात्र, आता मालिका अल्पविराम घेणार आहे.
‘उदे गं अंबे’ या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे, मयुरी कापडणे, गिरीश परदेशी, आराध्या लवाटे, क्षमा देशपांडे, ओमकार कर्वे, प्रसिद्धी किशोर अशा कलाकार मंडळींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आता ही मालिका काही काळासाठी ऑफ एअर होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांमधील ‘अ’कार पीठ म्हणजेच माहुरच्या रेणुका देवीचं महात्म्य आपण मालिकेच्या रुपात साक्षात अनुभवलं. आता उर्वरित शक्तिपीठांची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच झालेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळ्यात ‘उदे गं अंबे’ मालिकेचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
दरम्यान, या मालिकेत आदिशक्ती आणि शिवशंकरांची भूमिका साकारत असलेल्या देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. दोघं म्हणाले की, प्रेक्षकांनी दिलेल्या मायेमुळेच आणि कौतुकामुळेच आम्ही कलाकार आजवर धडाडीने काम करत आलो. जी उदंड माया तुम्ही आमच्यावर केलीत तेवढच निर्व्याज प्रेम तुमचं ‘उदे गं अंबे’वर ही होतं. आज आम्ही ही श्री रेणुका महात्म्याची पुष्पांजली देवी आईच्या चरणी ठेवत आहोत. जी काही कलारुपी सेवा आमच्या हातून घडली ती सगळी देवी चरणी आणि तुम्हा मायबाप रसिकांचरणी सादर समर्पित.
पुढे देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे म्हणाले, “आम्ही आभारी आहोत ‘स्टार प्रवाह’ आणि ‘कोठारे व्हिजन’चे ज्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची संधी आम्हाला दिली आणि ऋणी आहोत तुम्हा रसिक प्रेक्षकांचे ज्यांनी आम्हाला आपल्या हृदयात स्थान दिलं. आता पुन्हा येऊ नव्या शक्तिपीठाची गोष्ट घेऊन तोवर तूर्तास निरोप घेतो. हा निरोप पूर्णविरामाचा नाहीये हा अल्पविराम आहे. कारण आईची गाथा आभाळा एवढी आहे; ती अशी शे-पाचशे हजार भागांमध्ये सांगून संपणारी नाहीये. तेव्हा हा स्नेहबंध आणि माया अशीच जागती ठेवा…आपल्या मनामनात आणि घराघरात आईचा उदोकार गर्जू दे; उदे गं अंबे!!.. क्षण निरोपाचा नाही; अल्पविरामाचा.”