महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह’वर सातत्याने नवनवीन विषयांवर मालिका येत असतात. येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामधील एका नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकत्याच झालेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. या नव्या मालिकेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली गिरीजा प्रभू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
तसंच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील दुसऱ्या नव्या मालिकेची अद्याप घोषणा झालेली नाही. पण, या मालिकेत कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार याचा खुलासा झाला आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनेरे यांची प्रमुख भूमिका असलेली नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण, या दोन नव्या मालिकांमुळे कोणत्या जुन्या मालिका बंद होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली एक मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चे बरेच जुने कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारी ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘उदे गं अंबे’.
कोठारे प्रॉडक्शनची निर्मिती असलेली ‘उदे गं अंबे’ ही पौराणिक मालिका ११ ऑक्टोबर २०२४पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि इतिहास या मालिकेतून मांडण्यात आला आहे. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे, मयुरी कापडणे, गिरीश परदेशी, आराध्या लवाटे, क्षमा देशपांडे, ओमकार कर्वे, प्रसिद्धी किशोर अशा कलाकार मंडळींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आता या मालिकेचा सहा महिन्यातच गाशा गुंडाळणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, अद्याप याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. नुकत्याच झालेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळ्यात ‘उदे गं अंबे’ मालिकेचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
दरम्यान, ‘उदे गं अंबे’ मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.०० वाजता ‘स्टार प्रवाह’ प्रसारित होतं आहे. त्यामुळे ही मालिका बंद झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता कोणती मालिका प्रसारित होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.