Star Pravah New Serial Ude Ga Ambe : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने १ सप्टेंबरला ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व व इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नुकत्याच समोर आलेल्या दुसऱ्या प्रोमोतून मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी पूजनीय आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, भक्तांचं रक्षण करते. त्यामुळेच नवरात्रोत्सावात ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही मालिका ( Star Pravah ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : Video : टास्कमध्ये धक्काबुक्की, जोरदार राडा…; अरबाजचं ‘ते’ रुप पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “संग्राम भाऊ…”
‘उदे गं अंबे’ या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे भगवान शिवशंकर यांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर तो ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार आहे. तसेच देवदत्त नागेबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे झळकणार आहे. ही नवी मालिका ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता ही नवीन मालिका स्टार प्रवाह ( Star Pravah ) वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.
कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर कोणती जुनी मालिका संपणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. नव्या मालिका सुरू झाल्यावर अनेक जुन्या मालिका संपतात तर, काही वेळा टीआरपी लक्षात घेऊन जुन्या मालिकांचा स्लॉट बदलला जातो. ‘उदे गं अंबे’ ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित करणार असल्याचं वाहिनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला सायंकाळी ६.३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सुरू आहे.
दरम्यान, आता या नव्या मालिकेसाठी आनंदी-सार्थकची जोडी प्रेक्षकांचा निरोप घेणार की, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा स्लॉट बदलणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. तसेच काही नेटकऱ्यांनी देखील नव्या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका संपणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत.