Star Pravah : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर यंदा महिला दिनानिमित्त १४ मालिकांचे विशेष भाग प्रक्षेपित केले जाणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात ७ तासांचा कधीही न पाहिलेला ‘महासंगम’ यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या ओटीटीचं महत्त्व वाढत असताना आजही महाराष्ट्राच्या घराघरांत मराठी मालिका पाहिल्या जातात. या मालिकांमधील सगळी पात्र प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटतात. यामुळेच यंदा महिला दिनाच्या दिवशी ‘स्टार प्रवाह’च्या १४ मालिकांमधील १४ नायिका एकत्र येऊन हा खास दिवस आणखी खास करणार आहेत.

‘स्टार प्रवाह’च्या लेखिका आरती म्हसकर यांनी सध्याच्या मालिकांचं व त्यामधील नायिकांचं वर्णन करणारी एक खास कविता यानिमित्ताने लिहिली आहे. ही कविता ‘स्टार प्रवाह’च्या नायिकांचं अचूक वर्णन करते. “नवऱ्यांची लफडी, बायकाच बायकांच्या वैरी” हे असे ट्विस्ट मालिकांमध्ये का दाखवले जातात, सध्याच्या मालिका अशा का असतात? याचं उत्तर आरती म्हसकर यांनी या कवितेच्या माध्यमातून दिलं आहे.

मालिकांमधल्या नायिका या दुसऱ्या-तिसऱ्या कुणीही नसून आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत. बहीण, पत्नी, आई, मुलगी, प्रेयसी अशी अनेक नाती आपण त्यांच्या रुपात नेहमी जगत असतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याच नात्यांचा गौरव एका अनोख्या पद्धतीने होणार आहे. ८ मार्चला सलग ७ तास मालिकांचा महासंगम सोहळा रंगणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग होणार आहे.

‘स्टार प्रवाह’च्या लेखिका आरती म्हसकर यांची कविता

काय ह्या बायकांच्या सिरियल्स???
नवऱ्यांची लफडी
बायकाच बायकांच्या वैरी
का असतात अशा मालिका????
का वागतात अशा बायका???
कारण…
आजही जेव्हा हुंड्यासाठी जाळलं जातं बाईला,
किंवा मुलगा व्हावा म्हणून पाडलं जातं मुलीला
आजही जेव्हा कोणी उचलतं हात बाईवर,
किंवा राजरोसपणे अन्याय होतो तिच्यावर
तेव्हा-तेव्हा एखादी जानकी, एखादी अबोली जन्म घेत असते.
तिचं दुःख, तिचं जगणं आरसा बनून मांडत असते…
बाईने उठावं, लढावं, झगडावं आपल्या हक्कासाठी
व्हावं मुक्ता, व्हावं मंजिरी किंवा कला आणि मानसी
घर नाती सांभाळत स्वतंत्र उभी राहावी ती
याचसाठी असते मालिकेतील स्त्री… याचसाठी असते मालिकेतील स्त्री…

महिला दिनी होणाऱ्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “स्त्री शक्ती आणि तिचं समाजातलं महत्व आपण जाणतोच. तिची ही ताकद फक्त महिला दिनानिमित्त नाहीतर ‘स्टार प्रवाह’ नेहमीच साजरी करतं.” ८ तारखेला महाराष्ट्राच्या या महानायिका एकत्र येऊन विश्वास, कर्तृत्व, प्रेम, आनंद, सहवास, कुटुंब, परंपरा, मान, अभिमान या सगळ्या भावना व्यक्त करत एकत्र येऊन महाराष्ट्राला एक मोठी पर्वणी देणार आहेत. स्त्री शक्तीचा सन्मान करणारे हे विशेष भाग ८ मार्चला दुपारी १ ते ३ आणि संध्याकाळी ६:३० ते ११:३० पर्यंत वाहिनीवर प्रसारित करण्यात येतील.

Story img Loader