Star Pravah : ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ या दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एन्ट्री झाली होती. आता या पाठोपाठ आणखी एका मालिकेत लोकप्रिय अभिनेते एन्ट्री घेणार आहेत. रात्री उशिरा प्रसारित होत असली तरीही, ‘स्टार प्रवाह’च्या ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लवकरच मालिकेत अभिनेते विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उमाच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत.

जीजी म्हणजेच उमाचा हा भाऊ आयुर्वेदिक औषधांचा जुना जाणकार असून मंजिरीचा जीव धोक्यात असताना तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी बाळामामा पंढरपूरात आले आहेत. वृत्तीने कर्मठ, अभिमानी, परखड आणि स्पष्टवक्ते असलेल्या बाळामामाला समाजात प्रचंड आदराचं स्थान आहे. उमाला तू चुकते आहेस असं तोंडावर सांगू शकणारा बाळामामा तेवढाच लाघवी आणि प्रेमळ आहे.

बाळामामाची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी जीवघेण्या आजारावर मात करुन जवळपास २ वर्षांनंतर पुन्हा एकदा कलाक्षेत्रात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते मधल्या काळात लंग्ज फायब्रोसिस या आजाराने ग्रस्त होते. यानंतर त्यांच्यावर फुफ्फस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आजारपणामधून बरे होऊन विद्याधर जोशी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळत आहेत. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके बाप्पा जोशी आता ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या माध्यमातून एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

विद्याधर जोशी या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले, “दोन वर्षांनंतर आवडीचं काम करताना मला अतिशय आनंद होतोय. मनाला आतून उभारी येतेय असं वाटतं. माझ्या नशिबाने सेटवरची सगळीच मंडळी माझी काळजी घेत शूटिंग करत आहेत. ‘स्टार प्रवाह’चे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी देखील प्रचंड मानसिक आधार दिला. गेली दोन ते अडीच वर्षे आजारपणामुळे मी अभिनय क्षेत्रापासून लांब होतो. मात्र, आता माझी प्रकृती उत्तम आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करत आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतला बाळा मामा प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.

star pravah yed lagla premacha
विद्याधर जोशी ( star pravah yed lagla premacha )

दरम्यान, ‘येडं लागलं प्रेमाचं’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये पूजा बिरारी ( मंजिरी ), विशाल निकम ( राया ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader