‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत तेजस ही भूमिका साकारणारा अभिनेता समीर परांजपे(Sameer Paranjape) नेहमीच चर्चेत असलेला दिसतो. कधी त्याच्या मालिकेतील भूमिकेमुळे, तर कधी त्याच्या गाण्यांमुळे अभिनेता चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. समीरने होऊ दे धिंगाणा या शोमध्ये गायलेले नाच रे मोरा हे गाणे चांगलेच गाजले होते. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत पिझ्झा शॉपमधून तो पळून गेला होता, असे वक्तव्य केले आहे. समीर परांजपे नेमके काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

एक न्यूनगंड…

अभिनेता समीर परांजपेने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बार्शीहून पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींचा न्यूनगंड होता. त्याबद्दल अभिनेत्याने खुलासा केला. समीर परांजपे म्हणाला, “बार्शीहून पुण्याला आलो. एका मोठ्या सिटीमध्ये आल्यानंतर खूपच वेगळ्या गोष्टी होत्या. मी ती दोन वर्षं अनुभवलंलीत. ११ वीलाच मी पुण्याला गेलो. अकरावी-बारावी म्हणजे मला ती वर्षं आठवतही नाहीत, इतकी ती विचित्र होती. कारण- तुम्ही अॅडजस्टच होत नाही. सगळ्याच गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. एक न्यूनगंड आलेला असतो. मी आता अमुक एखाद्या व्यक्तीसमोर कसं बोलू? कोणासमोर काय बोलू? इतक्या बारीक बारीक गोष्टींचं दडपण आलं होतं.”

“पुण्याला आल्यानंतर मी पहिल्यांदा ‘पिझ्झा हट’मध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर तिथले दर बघूनच मला धक्का बसला. कारण- माझ्या गावामध्ये मी चार लोकांसह हॉटेलला जेवायला गेलो, तर एवढं बिल येतं, असं वाटलं. मग म्हटलं की बसलो तर आहे, आजूबाजूला बरेच लोक बसले आहेत, तर मी टेबलवरून उठू कसा? इथून कसं निघून जाऊ. पंचायत झाली होती. मग मी पुन्हा ते सगळं मेनू कार्ड वाचलं. विचार केला की, ज्या पदार्थाचा कमीत कमी दर असेल, ते आपण मागवू. त्यामध्ये डीप्सचे पर्याय होते. ते काय २०-२० रुपयांचे होते. तर, मी तिथे जाऊन ती ऑर्डर दिली होती. त्यांना म्हटलं मला हे हवंय. त्यांनी माझ्याकडे बघितलं. ते म्हणाले की नाही सर, हे डिप्स आहेत. हे तुम्हाला पिझ्झा किंवा कशाबरोबर तरी ते मागवावं लागेल. तर मला सैरभैर व्हायला झालं होतं. तर मी ओके ओके, असं म्हणत तिथून बाहेर पळालो.

इतका न्यूनगंड होता. कारण- मला गोष्टी माहीत नव्हत्या. त्या वेळेला असं वाटायचं की, आपल्याला काही माहीत नाहीये. न्यूनगंड आल्यासारखं व्हायचं की, अरे, आपण हे नकोच करायला. आपण मागेच राहूया. पण आता ज्यावेळी मागे वळून बघतो की, ठीक आहे. त्या वेळेला मला माहीत नव्हतं. तेव्हा जे योग्य वाटतं, ते मी केलं. पण इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी आणि बदलच पचवायला मला दोन वर्षं गेली. तो माझ्या आयुष्यातील अवघड काळ होता. गाण्यामुळे मला कॉलेजमध्ये मला थोडासा भाव मिळाला. नाही तर तिथेही मी काही पुढे येऊन करणाऱ्यातला नव्हतो. त्या वेळेला मी बुजलेलाच होतो”, असे म्हणत गावाहून पहिल्यांदा पुण्यात आल्यानंतर नवीन गोष्टी स्वीकारण्यात वेळ गेला. मात्र, गाणं आणि अभिनय या गोष्टींनी आत्मविश्वास दिला, असे म्हणत अभिनेता समीर परांजपेने आठवण सांगितली आहे.

Story img Loader