छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. संध्याकाळ झाली की, घरोघरी या मालिका पाहिल्या जातात. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सध्या आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकांमधील रंजक वळणं, ट्विस्ट, प्रसिद्ध कलाकारांची एन्ट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी उत्सुकता निर्माण होते. अशातच आता मराठी कलाविश्व गाजवणारा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘सोनी मराठी’ वाहिनीवर आता लवकरच एक नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या माध्यमांतून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारेल.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची पहिली झलक नुकतीच ‘सोनी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या मालिकेच्या माध्यमातून २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यात येणार आहे.
वाहिनीने पहिला प्रोमो शेअर करत त्यावर “नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची!कारण, ‘जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” असं कॅप्शन दिलं आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध-शिवानीची ऑनस्क्रीन एकत्र जोडी पाहून नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय मराठी कलाविश्वातील कलाकारांनी सुद्धा शिवानी सोनारचं मिळालेल्या या मोठ्या संधीबद्दल कौतुक केलं आहे.
हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! सायली कुसुमसमोर देणार प्रेमाची कबुली पण, निर्माण होणार मोठा गैरसमज…
‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका नेमकी कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ‘सोनी मराठी’वर या मालिकेचं प्रेक्षपण केलं जाईल. दरम्यान, सुबोध भावे बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये परतला आहे. यापूर्वी सुबोधने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘तुला पाहरे रे’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता या नवीन मालिकेत सुबोध आणि शिवानीच्या जोडीला आणखी कोणते कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुतकतेचं ठरणार आहे.