मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचं आता एक वेगळं बॉण्डिंग तयार झालं आहे. २००४ मध्ये या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेली २० वर्षे हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण आहे ती म्हणजे मानाची पैठणी साडी. ‘होम मिनिस्टर’च्या प्रत्येक भागात विजेत्या होणाऱ्या गृहिणीला पैठणी साडी दिली जाते. परंतु, या ही साडी भेट म्हणून देण्यामागे खास किस्सा आहे. याची खास आठवण सुचित्रा बांदेकर यांनी नुकत्याच सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल के करीब’ मुलाखतीमध्ये सांगितली आहे.
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…तेव्हा फार पैसे नसायचे. त्यामुळे आम्ही सोसायटीमधल्या बायकांनी मिळून पैठणी विकत घ्यायची असं ठरवलं होतं. त्यावेळी आदेशचं ‘होम मिनिस्टर’ चालू झालं नव्हतं. त्यामुळे ही गोष्ट साधारण २० वर्षांपूर्वीची असेल. तेव्हा आम्ही पैसे काढले होते त्यामुळे जिचा नंबर लागेल त्या बाईला ती पैठणी साडी मिळायची.”
“पैठणीची गोष्ट मी जेव्हा आदेशला सांगितली तेव्हा तो म्हणाला, पैठणी साडी एवढी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे? त्यालाही आश्चर्य वाटलं म्हणूनच आमची गोष्ट ऐकल्यावर आदेश ‘झी मराठी वाहिनी’शी बोलला होता. त्यानंतर मग गिफ्ट म्हणून पैठणी साडी द्यायला सुरुवात झाली. ज्या बायकांसाठी १५ ते २० हजारांची साडी घेणं कठीण असतं अशा सगळ्या बायकांना डोळ्यासमोर ठेवून साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आदेशने तेव्हा चालू केलेल्या त्या उपक्रमाचं श्रेय माझं आहे.” असं सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : लाकडी काम, सुंदर नेमप्लेट…; प्रसाद ओकने नव्या घराला दिलाय मराठमोळा टच, फोटो व्हायरल
दरम्यान, आदेश आणि सुचित्रा बांदेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. सुचित्रा बांदेकर ‘रथचक्र’ या मालिकेत काम करत असताना या दोघांची पहिली भेट झाली होती. पुढे या दोघांनी १९९० साली लग्नगाठ बांधली. गेल्या ३३ वर्षांपासून ही जोडी सुखी संसार करत असून त्यांच्या लेकाचं नाव सोहम बांदेकर असं आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो सुद्धा अभिनेता व निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.