महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम हा सध्या ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ सांभाळत आहे. याच प्रोडक्शनची नवी मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यानिमित्ताने आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर व सोहम विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना दिसत आहेत.
बांदेकर कुटुंबाने नुकताच ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी सुचित्रा बांदेकर यांनी सासूबाईंचा एक किस्सा सांगितला. सध्या त्यांनी सांगितलेला हा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला आवडलं प्रसाद ओकचं आलिशान घर, फोटो शेअर करत म्हणाली…
सुचित्रा यांना विचारण्यात आलं होतं की, सासरी रुळताना तुम्हाला पारंपरिक रितीरिवाज पाळावे लागले होते का? यावर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “माझं लग्न झालं तेव्हा मी १९ वर्षांची होते. माझं लग्न झाल्यानंतर लगेचच वटपौर्णिमेचा सण आला होता. मला आदेशच्या आईने कडक उपवास करायचा, असं सांगितलं होतं. पाणीही प्यायचं नाही, असं मला म्हणाल्या होत्या. मी सकाळी उठले तर मला लगेच सांगितलं, जा पहिलं अंघोळ कर. माझ्या सासूबाई देखील वर्किंग वुमन होत्या. अंघोळ करायला सांगितल्यानंतर मी पहिली अंघोळ केली. अंघोळ करून आल्यानंतर सांगितलं देवाची पूजा कर. पण त्याआधीच देवाची पूजा झाली होती. तरीही मला पुन्हा सांगितलं. तिथे त्यांनी सुगड वगैरे आणून ठेवली होती. त्यावर हळद कुंकू वाहायला सांगितलं. त्यानंतर वाण सासरे, आदेश, आदेशचा मोठा भाऊ यांना द्यायला सांगितलं. याशिवाय सगळ्यांना नमस्कार करायला बोलल्या. हे सगळं झाल्यानंतर त्या म्हणाल्या, नमस्कार केलास…आता जेव, पोटभर खाऊन घे. आता आयुष्यात पुन्हा कधी वटपौर्णिमा केली नाहीस तरी चालेल. माझ्यासाठी हा इतका अफलातून अनुभव होता. कधीच विसरू शकत नाही.”
पुढे आदेश बांदेकर म्हणाले, “माझी आई नर्स होती. यांना आताच्या पिढीचं काय कळणार? त्यामुळे दोन्ही पिढ्यांचा समन्वय साधला गेला पाहिजे म्हणून पूजा तर गेलीच पाहिजे, वटपौर्णिमेचं मूळ सार आहे, ते लक्षात ठेवा आणि कामाला लागा. तुम्हाला स्पर्धेत धावायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केलं पाहिजे. अशी तिची धारणा होती. ती खूप ग्रेट होती.”