‘द ग्रेट इंडिया लाफ्टर चॅलेंज’च्या आठव्या पर्वातून सुदेश लहरी( Sudesh Lehri)यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ते ओळखले जातात. दोन दशकांपासून ते मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. या काळात ते अनेक कॉमेडी शोमध्ये दिसले, ज्यामध्ये द कपिल शर्मा शोचादेखील समावेश आहे. नुकतेच ते अर्चना पुरन सिंह यांच्या यूट्यूब चॅनेलवर दिसले होते. अर्चना पुरन सिंह व त्यांच्या कुटुंबाशी बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुदेश लहरी काय म्हणाले?

अर्चना पुरन सिंह व त्यांच्या कुटुंबाशी बोलताना सुदेश लहरी यांनी म्हटले, “मी अनेकदा असे म्हटले आहे की मी आज ज्या ठिकाणी आहे, तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप कष्ट केले आहेत. जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती, त्यावेळी माझ्या संघर्षाचा काळ सुरू होता. मी दिवाळखोर झालो होतो. माझे घर विकावे लागले होते. सगळे मला हसत होते. मात्र, ज्यावेळी अर्चना सिंह माझ्यावर हसली, तेव्हा मी माझी अनेक घरे घेतली.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, मी माझ्या लहान वयापासूनच खूप कष्ट करायला सुरुवात केली, कारण मी गरिबी पाहिली होती. मी अनेक लहान दुकानांत कामे केली आहेत. मी चहा बनवला आहे, अनेक फॅक्टरीमध्ये काम केले आहे. मी चपला बनवल्या आहेत, भाज्या विकल्या आहेत. श्रीमंतांना खोटे बोलावे लागत नाही. मात्र, जेव्हा सावकार पैसे मागण्यासाठी येतात तेव्हा गरिबांना खोटे बोलावे लागते. हे सगळं माझ्यासाठी अभिनयाचा कोर्स असल्यासारखे होते.

प्रसिद्धी मिळण्याअगोदर सुदेश त्यांचे वैयक्तिक शो करायचे. त्यातील एक किस्सा सांगताना त्यांनी म्हटले, “मी एकदा शो करत होतो. तिथे एक दारू प्यायलेला माणूस होता. तो अचानक स्टेजवर आला, माझी कॉलर पकडली आणि माझ्या कानाखाली मारली. माझा माईक खाली पडला. माझे सहकारी त्याला मारण्यास तयार होते, मात्र मी त्यांना थांबवले. माझी निराशा झाली. मी काय करतोय असा प्रश्न पडला. हे लोक कोण आहेत, ज्यांना कलेची व प्रतिभेची किंमत नाही, असे विचार माझ्या डोक्यात आले. मी घरी परतलो व माझ्या पत्नीला सांगितले की पुन्हा मी कोणत्याही लग्नात शो करणार नाही.”

“मला माझे स्वत:चे असे काहीतरी करायचे होते. मला माझा स्वत:चा ब्रँड तयार करून प्रसिद्धी मिळवायची होती. मला माहीत होतं की मला माझं नाव मोठं करूनच सन्मान मिळणार आहे. त्यानंतर मला एका शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तो शो खूप गाजला. त्यादरम्यान मी अनेक ठिकाणी फिरलो.”

याबरोबरच, सुदेश लहरी यांनी गाणेदेखील गायले. ते पाहून अर्चना पुरन सिंह यांनी म्हटले की मी कधीच विचार केला नव्हता की हा खरंच अशिक्षित आहे. मला वाटायचे तो विनोद करत आहे. त्यावर सुदेश यांनी म्हटले, मी कधीच शाळेत गेलो नाही. नुकतेच आम्हाला एका जाहिरातीचे शूटिंग करायचे होते. त्यामध्ये शाळेतील मुलांची भूमिका होती, त्यावेळी मी पहिल्यांदा शाळेत गेलो.

दरम्यान, सुदेश यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगताना म्हटले, “माझे लग्न ठरले होते, त्यामुळे लोक लग्न कर म्हणून माझ्या पाठीमागे लागत असत. एकदा मी चिडून म्हटले की माझे आताच लग्न करा किंवा मग मी कधीच लग्न करणार नाही. हा संवाद रविवारी सकाळी १० वाजता झाला होता. १२ वाजेपर्यंत माझे लग्न झाले होते. आम्ही एका देवळात लग्नगाठ बांधली होती.”