Sukanya Mone Daughter Completed Masters : मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री सुकन्या मोनेंनी आपला ठसा उमटवला आहे. कलाविश्वात सक्रियपणे काम करताना अभिनेत्रीन आपलं घर, संसार या गोष्टी सुद्धा तेवढ्याच खंबीरपणे सांभाळल्या. या सगळ्यात त्यांना पती संजय मोने व लेक ज्युलियाची मोठी साथ मिळाली.
सुकन्या मोने ( Sukanya Mone ) त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत लेकीबद्दल भरभरून बोलत असतात. गेली काही वर्षे ज्युलिया परदेशात तिचं मास्टर्स पूर्ण करत होती. आता नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण झालं असून, अभिनेत्रीची लेक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. याबद्दल सुकन्या मोने यांनी राजश्री मराठीशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला आहे.
वन्यप्राणी जीवशास्त्र (वाइल्डलाइफ बायोलॉजी) म्हणजेच ‘मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’ या विषयात मास्टर्स पूर्ण करत होती. आपल्या आई-बाबांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात ज्युलियाने पाऊल ठेवलं आहे. तिच्या आई-वडिलांना सुरुवातीला या अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण, या सगळ्या प्रवासात सुकन्या व संजय मोने यांनी तिला कायम पाठिंबा दिला.
सुकन्या मोनेंनी केलं लेकीचं कौतुक
सुकन्या मोने सांगतात, “घरापासून लांब राहून तिथे जॉब करून ज्युलियाने हे यश मिळवलं आहे. याचा मला प्रचंड आनंद आहे. हे संपूर्ण श्रेय तिचं आहे, आमचा फक्त तिला पाठिंबा होता. स्वत: जॉब करून तिने स्वत:चा खरंच उचलला आणि तिकडे स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. मला या सगळ्याचं खूप कौतुक आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची तिला कायम जाणीव असते. ती ऑस्ट्रेलियात ‘मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ’ बायोलॉजीचं शिक्षण घेत होती. याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. पण, या विषयात चांगले गुण मिळवत ती उत्तीर्ण झाली आहे. याचा प्रचंड आनंद आहे. आता तिची जबाबदारी वाढलीये कारण आता ती तिथेच जॉब करेल.”
हेही वाचा : अमेरिका सोडून माधुरी दीक्षित मायदेशी काय परतली? म्हणाली, “माझे आई-बाबा आणि दोन्ही मुलं…”
दरम्यान, सुकन्या मोने ( Sukanya Mone ) यांची लेक ज्युलियाने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल सध्या तिच्यावर संपूर्ण कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.