Sukunya Mone : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. पण, याच बरोबरीने ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने या मालिकेत मंदार जाधवच्या आईची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

सुकन्या मोने काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रोमोमध्ये त्यांची झलक पाहताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या नव्या मालिकेबद्दल आणि मध्यंतरी घेतलेल्या दीड वर्षांच्या गॅपबद्दल सुकन्या मोने यांनी तारांगणशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.

सुकन्या मोने म्हणाल्या, “मला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. प्रेक्षकांनी जर माझ्यावर प्रेम केलं नसतं, तर कदाचित मी आज इथवर पोहोचले नसते. कारण, जे काही माझ्या आयुष्यात घडलं. माझा खूप वर्षांपूर्वी अपघात असो किंवा अलीकडचं सांगायचं झालं, तर मी जवळपास दीड वर्षे ब्रेक घेतला होता. या काळात मी आरोग्यावर लक्ष दिलं आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करतेय. हे सगळं झाल्यावर, मधल्या काळात ब्रेक घेऊन सुद्धा प्रेक्षक आपलंसं करतात ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे.”

गुडघ्याची गादी फाटली…

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “मला मालिकांमध्ये काम करणं खूप आवडतं. मी इथे खूप आनंदी असते. त्या दीड वर्षांच्या ब्रेकबद्दल सांगायचं झालं, तर मला थायरॉइड आहे… त्यामुळे काहीही झालं तरी माझं वजन हे वाढतच चाललं होतं. या सगळ्यात एक त्रास उद्भवला तो म्हणजे, माझ्या गुडघ्यात मिनिस्कस तयार झाला होता. याबद्दल सविस्तक सांगायचं झालं, तर आपल्या गुडघ्यात गादी असते, त्यावर कव्हर असतं नेमकं तेच माझं फाटलं त्यामुळे मला चालताना, उठताना अगदी बसतानाही त्रास व्हायचा. जवळपास मी महिनाभर झोपून होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं जास्त महत्त्वाचं काम असेल तरच उठायचं बाकी पूर्ण आराम करायचा. हे आता केलंस तरच तुला पुढे काम करता येईल. त्यामुळे मी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या.”

“डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे फिजिओथेरपी, अल्ट्रा साऊंड, आयएफटी अशा सगळ्या प्रक्रिया मी पूर्ण केल्या. आता मी बरी झाले असले तरीही मध्येच थोडा-थोडा त्रास होतो. पण, या सगळ्यात आमच्या नव्या मालिकेच्या प्रोडक्शन टीमची खूप मदत होते. ते लोक माझी खूप काळजी घेतात. माझे सहकलाकार सुद्धा माझी काळजी करतात. माझे हात धरून माझ्याबरोबर चालतात…आता पुन्हा एकदा मी कामाला सुरुवात केलीये आणि सर्वांमधली सकारात्मकता पाहून कामाची एक नवीन ऊर्जा मिळते.” असं सुकन्या मोने यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही नवीन मालिका येत्या २८ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. यामध्ये गिरीजा प्रभू, मंदार जाधव यांच्यासह वैभव मांगले, सुकन्या मोने, साक्षी गांधी, अमित खेडेकर, अमृता माळवदकर यांसारखे कलाकार झळकणार आहेत.