छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधवी निमकरला ओळखलं जातं. सध्या ती ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. माधवीने इंडस्ट्रीत कोणाचंही पाठबळ नसताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या दिवसात तिला खूप संघर्ष करावा लागला होता. पण, हळुहळू माधवीने मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यात तिचा फिटनेस विशेष लक्ष वेधून घेतो. नुकत्याच राजश्री मराठीच्या मुलाखतीत अभिनेत्रीने करिअर, कुटुंब आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे.
इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिनेत्रीला गरोदरपणानंतर कमबॅक करणं फार कठीण जातं. अनेकदा काम मिळेल की नाही याबाबत अभिनेत्रींच्या मनात साशंकता असते. बाळ झाल्यावर काम मिळेल का? याविषयी माधवीला विचारलं असता ती म्हणाली, “गरोदरपणात कोणत्याही महिलेचं साधारण १५ किलो वजन वाढतं. आपले जुने कपडे आपल्याला होत नाहीत. त्यामुळे कोणत्याही अभिनेत्रीला किंवा सर्वसामान्य स्त्रीला कामाचं दडपण येणं हे स्वाभाविक आहे.”
माधवी पुढे म्हणाली, “मी सुरुवातीपासून माझ्या आरोग्याची खूप काळजी घेते. माझं डाएट सुरु असतं. त्यामुळे बाळ झाल्यावर काम मिळणार की नाही याचं दडपण मलाही आलं होतं. ६२ किलो वजन पाहून आपल्याला पुन्हा एकदा पन्नाशीत यायचंय हे मी मनाशी ठरवलं होतं. कारण, पुन्हा काम करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.”
हेही वाचा : खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
“सुट्ट्या घेऊन घरी बसून राहणं मला जमत नाही. माझ्यासाठी आजही दहा दिवसांची सुट्टी पुरेशी असते. त्यामुळे पुन्हा काम करायचं हे आधीपासून ठरवलं होतं आणि यासाठी मी फिट असणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं होतं. बाळ झाल्यावर काही महिन्यांनी तासभर चालणं, तासभर योगा, डाएट यावर मी लक्ष दिलं. ब्रेस्ट फिडींग असल्यामुळे जास्त डाएट न करता मी योग्य व्यायाम करण्यावर भर दिला. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन मी हळुहळू काम करायला सुरुवात केली. तेव्हा एखादी अभिनेत्री सलग ४-५ महिने दिसली नाहीतर, कुठे गेली असं लोकांना वाटायचं. आता सुदैवाने सोशल मीडियामुळे असं होत नाही. चाहत्यांच्या संपर्कात राहता येतं. तो एक ते दीड वर्षांचा काळ गेल्यानंतर पुन्हा फिट होऊन काम करायचं हा प्रवास नक्कीच छोटा किंवा सोपा नव्हता. बॉलीवूडमध्ये असं नाहीये… आजच्या घडीला काजोल, आलिया सुद्धा मुलं झाल्यावर मुख्य भूमिका करतात. पण, आपल्याकडे लगेच “अरे एका मुलाची आई झाली” असं म्हटलं जातं. तरीही मला मनात विश्वास होता की, मला काम नक्की मिळेल आणि आज मी काम करते आहे.” असं माधवीने सांगितलं.