‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू(Girija Prabhu)प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिची गौरी ही भूमिका लोकांना प्रचंड आवडल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni)बरोबरचा एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाली कुलकर्णी ताईने मला….

गिरीजा प्रभूने नुकतीच टोटल मराठीला मुलाखत दिली. गिरीजा प्रभूने युवा डान्सिंग क्वीन या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातील एक आठवण सांगत तिने म्हटले, “शोमधील दुसरा-तिसराच आठवडा होता, मी एक एमजे-लावणी हा अ‍ॅक्ट केला होता. म्हणजे एकाच वेळेला मला मायकल जॅक्सनची स्टाईलही करायची होती आणि लावणीही करायची होती. ते दोन्ही एकत्र आणणं आणि एकत्र आणल्यानंतरसुद्धा ते वेगळं वाटणं गरजेचं होतं, त्यामुळे ते चॅलेजिंग होतं. लावणी असेल तर एका बाजूला आणि मायकल जॅक्सन असेल तर दुसऱ्या बाजूला वळून डान्स करायचा होता. तर ते माझ्यासाठी अवघड होतं. त्या अ‍ॅक्टमध्ये अचानक थोडेसे बदल झाले. तो परफॉर्मन्स झाला. तो झाल्यानंतर सोनाली कुलकर्णी ताईने मला एक नोट दिली होती. ती माझ्या पाया पडली होती. एकतर ती स्वत: नृत्यांगना आहे, त्यामुळे तिने असं काही करणं हे माझ्या कायम लक्षात राहणार आहे. तो अ‍ॅक्टसुद्धा माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण मी अजून काय वेगळं करू शकते, हे त्या प्रोसेसमधून शिकले. मी असंही काही वेगळं करू शकते, हे मला तेव्हा कळलं; त्यामुळे तो अ‍ॅक्ट कायम लक्षात राहणार आहे.”

गिरीजा प्रभू अभिनेत्री असण्याबरोबरच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेआधी तिने ‘लक्ष्य’, ‘क्राइम डायरी’ अशा विविध शोमध्ये भूमिका निभावल्या आहेत. मात्र, गिरीजाला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून वेगळी ओळख मिळाली. गौरी-जयदीपची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरली. जयदीपची भूमिका अभिनेता मंदार जाधवने साकारली आहे. आता या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता गिरीजा कोणत्या मालिका किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu shares memories of sonalee kulkarni nsp