अभिनेत्री गिरीजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर, अमेय बर्वे, हर्षदा खानविलकर, गिरीश ओक अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०२० पासून सुरू झालेल्या या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. त्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं दुसरं पर्व सुरू झालं. या पर्वात नवनवीन चेहरे पाहायला मिळाले. पण, आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिका ऑफ एअर होणार आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या रात्री ११ वाजता प्रसारित होतं आहे. पण, या मालिकेची जागा ‘अबोली’ मालिका घेत आहे. कारण ‘अबोली’ मालिकेच्या वेळेत म्हणजे रात्री १०.३० वाजता २३ डिसेंबरपासून ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अखेर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका बंद होणार आहे.
मालिका बंद झाल्यानंतर अभिनेता मंदार जाधवाला सेटवरील एका जागेची खूप आठवण येणार आहे. याबाबत त्याने स्वतः सांगितलं आहे. मंदार जाधवचा हा व्हिडीओ ‘कोठारे व्हिजन’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणाला, “नमस्कार मी मंदार जाधव म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका अधिराज. आज मी तुम्हाला अशी जागा दाखवणार आहे, ज्याची मला खूप आठवण येणार आहे. ते म्हणजे सेटवरील गणपतीचं मंदिर. गेली पाच वर्षे मी या सेटवर येतोय. जेव्हा मी इथे पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. नंतर मला कळलं की, कोठारे व्हिजनची या सेटवर जी पहिली वहिली मालिका होती, तेव्हा हे मंदिर बांधलं होतं. तेव्हापासून हा गणपती बाप्पा इथे विराजमान आहे. त्यामुळेच सेटवर एवढी सकारात्मकता असते.”
हेही वाचा – विजय कदम यांची पत्नी पद्मश्री जोशींबरोबर ‘अशी’ झाली होती पहिली भेट, किस्सा सांगत म्हणाल्या…
पुढे मंदार जाधव म्हणाला, “मी नेहमी मेकअप रुममध्ये जाण्याआधी बाप्पाचं दर्शन घेतो आणि त्यानंतर कामाची सुरुवात करतो. या मंदिराच्या कट्ट्यावर बसून आम्ही गप्पा मारतो. संध्याकाळचा चहा इथेच बसून पितो. त्यामुळे मालिका संपल्यानंतर या जागेची मला खूप आठवण येणार आहे.”
हेही वाचा – Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
दरम्यान, मंदार जाधवच्या या व्हिडीओवर अभिनेता आदिनाथ कोठारेने प्रतिक्रिया दिली आहे. तसंच चाहत्यांनी “तुमची आठवण येईल”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.