साडे तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका करत आहे. गेल्या वर्षी या मालिकेचं दुसरं पर्व सुरू झालं. २५ वर्षांचा लीप घेत गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सध्या पाहायला मिळत आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ही मालिका सुरुवातीपासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही काही मागे नाही. नवनवीन ट्विस्टने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे.
सध्या या मालिकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्या एका व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये ते वॉकर घेऊन काम करताना दिसत आहे. नेमकं काय घडलं आहे? हे अभिनेता मयूर पवारने सांगितलं आहे. मयूरने सोशल मीडियावर चंद्रकांत यांचा व्हिडीओ शेअर करत भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
मयूर पवारची पोस्ट
नमस्कार. या लेखातल्या भावना संपूर्ण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ टीमच्या भावना आहेत. तर, आपल्या या लाडक्या मालिकेचं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे सर करतायत. खरंतर चंदू सरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. तर झालं असं की, मागच्या महिन्यात शूट संपवून घरी जात असताना चंदू सरांचा अपघात झाला. सरांना ४ आठवडे बेडरेस्ट सांगितला. चंदू सरांचं कामाबद्दल इतकं कमालीचं डेडीकेशन आहे की ते कधी सेटवर असताना सुद्धा बसत नाहीत. सीन कसा चांगला होईल? किंवा लिहून आलेल्या सीनमध्ये आपण अजून काय करू शकतो? या विचारात ते सेटवर सतत येरझाऱ्या घालत असतात. आम्ही चंदू सरांना फक्त ब्रेक झाल्यावर जेवताना बसलेलं बघितलंय. त्याआधी किंवा त्यानंतर हा माणूस कधीच बसलेला दिसत नाही. जसजसे ४ आठवडे पूर्ण होत होते तसतशी चंदू सरांची कामाबद्दलची तळमळ वाढत होती. ते सतत सेटवर फोन करून सीन कसा करायला पाहिजे याबद्दल शशी सरांशी चर्चा करत होते.
शशी सर हे आपल्या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक. चंदू सरांच्या अनुपस्थितीत शशी सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सेट हाताळला आणि सर्व कलाकारांना हाताशी धरून मालिकेचं शूटिंग तितक्याच जोमात सुरू ठेवलं. या दरम्यान एक प्रोमो शूट करायचा होता जो खूप महत्वाचा होता. हे कळल्यावर चंदू सरांना राहवेना. काहीही झालं तरी हा प्रोमो आपणच करायचा असं चंदू सरांनी ठरवलं आणि सेटवर फोन करून ‘मी येतोय’ असं सांगितलं. कामाप्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा चंदू सरांना सेटपर्यंत घेऊन आली. सर सेटवर येताच स्पॉट दादांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण खुश झाला आणि प्रत्येकात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली.
सरांना कुठलाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली. दिग्दर्शकासाठी संपूर्ण टीम इतकी राबत असल्याचं, मालिकेच्या सेटवर खूप कमी पाहायला मिळतं. चंदू सरांनी इतर कुठलाही विचार न करता, सेटवर येऊन प्रोमो दिग्दर्शित केला आणि नेहमीप्रमाणेच कमाल केली..‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ याची खऱ्या अर्थानं प्रचिती आली… आमच्या मालिकेच्या पूर्ण टीमला खूप प्रेम…चंदू सर लवकरात लवकर बरे व्हा. खूप काम करायचंय. बाकी तुमच्या आशीर्वादाने आणि आपल्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने आपला टी.आर.पी. वाढतच आहे, तो असाच वाढत राहो आणि लवकरात लवकर पुन्हा तुम्हाला सेटवर त्याच एनर्जीत बघायला मिळो, ही नटराजचरणी प्रार्थना…तुम्ही ग्रेट आहात हे सांगायची गरजच नाही. लव्ह यू सर…
हेही वाचा – शाहिद कपूरचा संघर्ष: चॉकलेट बॉयची इमेज ते राऊडी हिरो…
मयूरच्या या पोस्टवर मालिकेतील इतर कलाकारांसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. भक्ती रत्नपारखी, अमेय बर्वे, हर्षद अतकरी, अश्विनी कासार अशा अनेक कलाकारांनी चंद्रकांत कणसे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.