उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई-पुण्यातून अनेक लोक आपल्या मूळ गावी जातात. सर्वसामान्य लोकांप्रमाणे मालिकाविश्वातील कलाकारसुद्धा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत गावची वाट धरतात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिका शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकरसुद्धा शूटिंगमधून ब्रेक घेत कोकणात पोहोचली आहे. माधवीने कोकण ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : कार्तिक-कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ लवकरच होणार रिलीज, चित्रपटातील शेवटच्या गाण्यासाठी उभारला भव्य सेट
माधवी निमकर सध्या तिच्या आजोळी गुहागरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कोकणात नारळाच्या झावळ्यांपासून खराटा म्हणजेच झाडू बनवला जातो. माधवीनेसुद्धा झाडू बनवतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री माधवी निमकर, सुरीच्या साहाय्याने नारळाच्या झावळ्यांमधून हिरवा भाग वेगळा करून झाडू बनवण्यासाठी उरलेल्या काड्या वेगळ्या ठेवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत माधवीने यावर ‘कोकणची माणसं साधीभोळी…’ हे गाणे लावून, “खूप वर्षांनंतर हे काम मी करतेय. कोकण… गुहागर” असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; १७ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या एकूण कमाई
माधवीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावर तिच्या एका चाहत्याने, “गो बाय, झाडू सोलताना बोटांना कापड बांधतात गो बाय…” अशी मालवणी भाषेत कमेंट करीत तिला काळजी घेण्यास सांगितले आहे. झाडू बनवण्याच्या व्हिडीओव्यतिरिक्त माधवीने फणस सोलतानाचा फोटोसुद्धा शेअर केला होता.
कोकणातील गुहागर हे माधवीचे आजोळ आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलाबरोबर माधवी गुहागरला गेली आहे. गावी गेल्यावर तिने गुहागरमधील प्रसिद्ध मंदिरांनाही भेट दिली होती.