‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही चांगलीच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे आता नवं पर्व सुरु झालं आहे. यात शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत मल्हार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता कपिल होनरावने एक्झिट घेतली. नुकतंच त्याच्यासाठी शालिनीने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनी हे पात्र माधवी निमकर साकारत आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने मल्हारबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या पोस्टमध्ये तिने त्याचे आभार मानले आहेत.
माधवी निमकरची पोस्ट
“आपण एकत्र काम करण्याचा हा प्रवास खूपच मस्त होता. गेली ३ वर्ष कधी संपली, कळालंच नाही. शालिनी आणि मल्हार म्हणून कितीतरी सुंदर आठवणी आहेत. मजा, मस्ती, गप्पा अशा खूप खूप आठवणी आहेत.
शालिनी मल्हारचा प्रवास थांबला. पण नक्कीच लवकरच परत एकत्र काम करु. शालिनी-मल्हार जोडीला खरंच भरभरुन प्रेम मिळालं. माझी ही पोस्ट सर्व फॅन पेजेससाठीही आहे. ज्यांनी आमचे रिल्स, फोटो, पोस्ट करुन त्यांचं आणि त्यांना फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांचे मनापासून आभार. तुमचे हेच प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद असाच कायम ठेवा”, असे माधवीने म्हटले आहे.
दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या पर्वात अनेक नवीन कलाकार झळकणार आहेत. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, गिरीश ओक, अमेय बर्वे, मयुर पवार हे कलाकार या मालिकेत झळकताना दिसत आहेत. त्याबरोबरच यात गौरी, मल्हार, शालिनी यांच्याही भूमिका पाहायला मिळत आहेत.