मालिका आणि प्रेक्षक यांचं एक वेगळं नातं असतं. जर प्रेक्षकांनी एखादी मालिका डोक्यावर घेतली तर ती मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचते. पण मालिकेतील ट्विस्ट रटाळ वाटू लागले की प्रेक्षक त्या मालिकेकडे पाठ फिरवतात. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होतो. मग मालिका बंद करावी लागते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अशा बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असून नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत.
आता ‘स्टार प्रवाह’वर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो कालच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री किशोर अंबिये आणि ईशा केसकर झळकल्या. त्यामुळे सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण अशातच ‘स्टार प्रवाह’वरील एक लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.
हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यातच गुंडाळावी लागली ‘ही’ मालिका; अचानक घेतला प्रेक्षकांचा निरोप
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या या वेळेत सुरू असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या मंचावर अर्जुन सायलीला करणार प्रपोज, पाहा व्हिडीओ
“बरं झालं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ संपत आहे”, “अखेर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ संपत असल्यामुळे सुख मिळालं एकदाशी”, “‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा शेवट होणार, बरं झालं..खूप कंटाळा आला होता, तोच तोच ड्रामा बघायला”, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या उमटत आहे. त्यामुळे सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे गौरी आणि जयदीपची मालिका ही ऑफ एअर होणार की नव्या वेळेत पाहायला मिळणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा – “आईचे दागिने, मैत्रिणीचे कपडे अन्…”, घराचा EMI भरण्यासाठी केतकी माटेगावकरने केली अशी बचत; म्हणाली…
दरम्यान, गेल्याच महिन्यात ४ सप्टेंबरला ‘स्टार प्रवाह’वर अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे टीआरपीच्या यादीतही ‘प्रेमाची गोष्ट’ अव्वल स्थानावर आहे.