‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सुमीत पुसावळे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. काही दिवसांआधी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत एन्ट्री घेतली. नुकत्याच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सुमीतने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून का ब्रेक घेतला याचं कारण स्पष्ट केलं आहे.
सुमीत याबद्दल सांगताना म्हणाला, “माझ्याकडे ही मालिका आली आणि याबद्दल विचारणा झाली तेव्हा मी नोटीस पीरेडवर होतो. मला सर्वप्रथम ही भूमिका, कथा या सगळ्याची कल्पना देण्यात आली. कथा ऐकल्यावर या मालिकेची गोष्ट मला खूप आपलीशी वाटली. मालिकेतील सगळी पात्र एकदम स्वत:च्या घरातल्यासारखी मला वाटली.”
हेही वाचा : चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २’साठी स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर निघाले कोकणात, पाहा फोटो…
“एकंदर मी सगळ्याच गोष्टींचा विचार केला. ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या निमित्ताने स्वत:ला एका वेगळ्या भूमिकेत सिद्ध करण्याची मला एक चांगली संधी मिळत होती. त्यामुळे मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. या संधीचं सोनं करायला पाहिजे असं जाणवलं. कारण, अनेक मालिका येतात जातात परंतु, एखादी मालिका तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आता ही नवीन मालिका माझ्या आयुष्यातील सेकंड टर्निंग पाँईंट होऊ शकतो. त्यामुळे आता मी जबाबदारीने काम करत आहे.” असं सुमीत पुसावळेने सांगितलं.
दरम्यान, सुमीत पुसावळे आणि रेश्मा शिंदे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रमुख कलाकारांशिवाय मालिकेत यामध्ये सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहे.