Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या विविध विषयांवर आधारित नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक आगळावेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येतेय ‘हुकुमाची राणी’. आता ही राणी नेमकी कोण आहे आणि ती सर्वांच्या मनावर कशी राज्य करणार याची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर आलेली आहे.
‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘हुकुमाची राणी ही…’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. मालिकेच्या प्रोमोची सुरुवात कामगारांना कंपनीने दिलेल्या जाहीर सूचनेने होते. यावर कामगारांना १८ तास काम करणं बंधनकारक आहे असं मजकूर लिहिलेला असतो. एवढे तास कसं करायचं या संभ्रमात कामगार पडतात. इतक्यात याठिकाणी मालिकेच्या नायकाची एन्ट्री होते. ही भूमिका अभिनेता अक्षय पाटील साकारत आहे. तो सर्वांना दटावून नियमांचं पालन करावंच लागेल अशी ताकीद देतो.
कामागारांची सभा सुरू असताना मोठ्या रुबाबात येते या मालिकेतील हुकुमाची राणी…ती फळ्यावर लिहिलेले १८ तास खोडते आणि ८ तास लिहिते. याशिवाय हुकुमावरून हा शब्द खोडून ती ‘८ तास काम कायद्यानुसार’ असं फळ्यावर नमूद करते. तिच्या एन्ट्रीने कामगारांना एक नवीन हुरुप मिळतो.
“मुजोरशाहीला पाजणार पाणी, सर्वांच्या मनावर राज्य करणार ‘हुकुमाची राणी’… नवी मालिका ‘हुकुमाची राणी ही’ लवकरच… आपल्या सन मराठीवर.” असं कॅप्शन देत या नव्या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री वैभवी चव्हाण साकारत आहे. यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत तिने प्रियाची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता वैभवीला ‘हुकुमाची राणी ही’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या मालिकेच्या पहिल्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेची निर्मिती ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ फेम श्वेता शिंदेने केली आहे. त्यामुळे या मालिकेकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.