‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरीही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आज सर्वत्र अक्षयाला ‘सुंदरा’, ‘लतिका’ या नावांनी ओळखलं जातं. परंतु, मनोरंजन विश्वात आपला जम बसवण्यापूर्वी अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. या सगळ्या काळात तिला सहकलाकारांनी कशी मदत केली याशिवाय बॉडी शेमिंगबद्दल ‘अल्ट्रा मराठी बझ’च्या मुलाखतीत अक्षयाने मत मांडलं आहे.
“इंडस्ट्रीत जेव्हा काम करायला सुरुवात केलीस तेव्हा कमी किंवा मोजक्या भूमिका वाट्याला येतील याची भिती तुझ्या मनात होती का?” यावर अभिनेत्री अक्षया नाईक म्हणाली, “माझ्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या मित्रमंडळींना मला पुढे जाऊन अभिनेत्री व्हायचंय हे माहिती नव्हतं. कारण, स्वत:बद्दल माझ्या मनात एवढा आत्मविश्वास नव्हता. कॉलेज झाल्यावर मी एक वर्षांचा गॅप घेणार, मी बारीक होणार अन् त्यानंतर ऑडिशन्सला जाणार असं मी ठरवलं होतं. तोच माझ्या लाइफचा प्लॅन होता.”
हेही वाचा : मराठमोळी सोनाली खरे ‘अशी’ झाली पंजाबी कुटुंबाची सून! लग्नाबद्दल म्हणाली, “रजिस्टर मॅरेज करून नंतर…”
बॉडी शेमिंगबद्दल सांगताना अक्षया पुढे म्हणाली, “इंडस्ट्रीत काम सुरू केल्यावर माझे सगळे कलाकार खूप जास्त चांगले होते. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेच्या सेटवर सुद्धा माझे सगळे सहकलाकार खूपच चांगले होते. मेधा जांभोटकर, क्षिती जोग, शिरीन सेवानी, लता सेठ या सगळ्या अभिनेत्रींनी मला खूप जास्त आत्मविश्वास दिला. त्या मला सांगायच्या, अक्षया आम्ही जेव्हा ऑडिशनला जातो तेव्हा आमच्यासारख्या दिसणाऱ्या शंभर मुली रांगेत उभ्या असतात. पण, तुझं असं नाहीये. तू ऑडिशनला जाशील तेव्हा तुझ्यासारखं दिसणारं इतर कोणीच तिथे नसेल.”
हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी वानखेडेवर पोहोचली देशमुखांची सून! जिनिलीयाने दोन्ही मुलांसह शेअर केले खास फोटो
“मला ते वाक्य एवढं भावलं की, माझं असं झालं ज्याला मी माझा कमीपणा समजतेय तिच माझी उजवी बाजू आहे. खरं सांगायचं झालं, तर मी जाड असण्याबद्दल मला घरून कधीच कोणी प्रेशर दिलं नाही. आता सुद्धा मी डाएट बोलले की, घरच्यांना तणाव येतो अरे बापरे! आता ही जेवण सोडतेय की काय? अर्थात या सगळ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मला एक वेळ द्यावा लागला. मला कोणी रिजेक्ट करण्यापेक्षा आपण कसे टॉमबॉय आहोत असं मी दाखवायचे. मला कुर्ते आवडायचे, नटायला आवडायचं पण, तेव्हा मी फार लूज कपडे घालायचे. आयुष्यात मला जेवढ्या लोकांनी हिणवलं तेवढ्याच लोकांनी मला साथ दिली. त्यामुळे हळुहळू माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. आता मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही.” असं अक्षया नाईकने सांगितलं.