मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही वर्षांत मुंबईत स्वत:चं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. पृथ्वीक प्रताप, रुचिरा जाधव, प्रसाद ओक, मंगेश देसाई, अश्विनी महांगडे, गिरीजा प्रभू, मयुरी वाघ या कलाकारांनी नवीन घर खरेदी करत अलीकडेच आपलं स्वप्न पूर्ण केलं. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अदिती द्रविडने अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
अदिती द्रविडने घेतलं नवीन घर
मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती द्रविडने मुंबईत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. याची खास पोस्ट आणि आपल्या घराची पहिली झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये गृहप्रवेश पूजन तर, तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक ८०१ असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : ATM मधून आल्या फाटलेल्या नोटा; ‘पारू’ फेम अभिनेत्री नामांकित बँकेवर संतापली; शेअर केला फोटो
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अदितीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना दिली आहे. “फायनली आय सेड येस टू मुंबई…माझं स्वत:चं घर, स्वप्नपूर्ती!” असं कॅप्शन अदितीने या फोटोला दिलं आहे. अदितीच्या या नव्या घरातून अतिशय सुंदर व्ह्यू पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Video : ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’, माधुरी दीक्षितसह अंकिता लोखंडेचा जबरदस्त डान्स; म्हणाली, “मॅम मी तुमची…”
सध्या अभिनेत्रीवर कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. समृद्धी केळकर, अभिजीत खांडकेकर, सावनी रविंद्र या कलाकारांनी तिने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्स करत अदितीला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अदिती ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये झळकली होती. या मालिकेचं कथानक लतिकावर आधारित होतं. यामध्ये लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईकने साकारली होती. तर, अभ्याची मैत्रीण नंदिनीच्या भूमिकेत अदिती झळकली होती. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी चित्रपटासाठी तिने ‘मंगळागौर’ हे गाणं लिहिलं होतं. सध्या नव्या घरासाठी अदितीवर कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.