मराठी कलाविश्वातील निरंजन कुलकर्णी, अनघा अतुल, अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे, तेजस्विनी पंडित अशा असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसाय क्षेत्रात एक नवी भरारी घेतली आहे. अभिनय क्षेत्र सांभाळून या कलाकारांनी कपडे, हॉटेल, सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित असे स्वत:चे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. यात आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीचं नावं जोडलं गेलं आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये लतिकाची मुख्य भूमिका साकारणारी अक्षया नाईक आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. अक्षयाचं मूळ गाव गोव्यात आहे. त्यामुळे अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या साथीने गोव्यात हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अक्षयाच्या गोव्यातील सुंदर बंगल्यात आता नागरिकांना भाडं भरून राहता येणार आहे. ‘नाईक होम स्टे’ असं तिने या बंगल्याचं नाव ठेवलं आहे.
अक्षया नाईक ही पोस्ट शेअर करत लिहिते, “गोव्यातील आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं आहे. रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन तुम्ही येथे निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आमच्या नाईक होम स्टेमध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर दूर आणि करमाळी रेल्वे स्थानकापासून फक्त ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या घरात स्वागत करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतेय…”
हेही वाचा : “एखादा चौकार, षटकार…”, ‘सॅम बहादुर’ व ‘अॅनिमल’च्या क्लॅशबद्दल विकी कौशलचं क्रिकेटच्या भाषेत उत्तर
दरम्यान, अक्षया नाईकच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्याकडे कमेंट सेक्शनमध्ये एका दिवसाच्या भाडेदराबाबत चौकशी केली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेनंतर अक्षयाने रंगभूमीवर पदार्पण केलं. सध्या ती ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.