मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. अंकिता वालावलकर, दिव्या पुगावकर, अभिषेक रहाळकर यांच्या पाठोपाठ आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधल्याचे फोटो समोर आले आहेत.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच कुणाल धुमाळ. यामध्ये त्याने देवव्रत कारखानीस ही भूमिका साकारली होती. ‘कलर्स मराठी’ची ही मालिका घराघरांत लोकप्रिय होती. २०२३ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण, कुणालने साकारलेला देवव्रत प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. आता अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात लग्नगाठ बांधत एक नवीन सुरुवात केली आहे. अभिनेत्याच्या लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो त्याच्या मित्र-मैत्रिणींनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कुणाल धुमाळने डॉ. सोनाली काजबेशी लग्नगाठ बांधली आहे. फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर हे जोडपं आता विवाहबंधनात अडकलं आहे. या दोघांच्या लग्नाला अभिनेत्री गार्गी फुलेने उपस्थिती लावली होती.
कुणाल व त्याच्या पत्नीने लग्नात पारंपरिक लूक केला होता. हिरव्या रंगाची नऊवारी साडी, त्यावर गुलाबी रंगाचा शेला, मुंडावळ्या या लूकमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत होती. तर, वरमाला घालताना या दोघांनीही इंडो-वेस्टर्न लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्याच्या पत्नीने भरजरी लेहेंगा घातला होता.
कुणालची पत्नी डॉ. सोनाली काजबे ही २०१९ मध्ये ‘मिस महाराष्ट्र’ ठरली होती. याशिवाय व्यवसायाने ती डेंटल सर्जन असल्याचं तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलं आहे. तर, कुणालने आतापर्यंत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेसह ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत झळकला आहे. याशिवाय ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांमध्येही त्याने काम केलेलं आहे.
दरम्यान, सध्या कुणाल धुमाळवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अक्षया नाईक, गार्गी फुले, अंबर गणपुळे, तन्वी मुंडले या कलाकारांनी अभिनेत्याला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.