Sunetra Pawar Post for Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला विजेता मिळाला आहे. बारामतीजवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाणने ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरज चव्हाण घरातील सर्व सदस्यांना मागे टाकत या शोचा विजेता ठरला, तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. सूरज जिंकल्यावर त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजकीय नेतेमंडळीही त्याच्यासाठी पोस्ट करत आहेत. सुप्रिया सुळेंनंतर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी सूरजसाठी पोस्ट शेअर केली.
सूरज चव्हाणचे कौतुक करायला शब्द अपुरे पडत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.
बारामतीचा सूरजने बिग बॉस जिंकले ..!
आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्धी पावला आहे. समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे.
सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती, की हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे.
हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”
सूरजला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आवाहन केले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याच्या मोढवे गावी जाऊन तो विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे सार्थक झाले. या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन, अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या पोस्टवर लोक कमेंट करू सूरजचं अभिनंदन करत आहेत. ‘अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील बारामतीचा सुरज चव्हाण यंदाच्या मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता ठरला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. दुनियेच्या झगमगाटात आपल्यातील जिद्दीचा व साधेपणाचा प्रकाश नेहमीच उठून दिसतो हा संदेश सुरजने संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या उज्वल यशाबद्दल सुरज चव्हाणचे हार्दिक अभिनंदन व यापुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा..!,’ ‘वेळ प्रत्येकाची येते हे सिद्ध केलं भावा तू’ अशा कमेंट्स सुनेत्रा पवार यांच्या पोस्टवर आहेत.