Supriya Pathare : आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं. अशाच एका छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय अभिनेत्रीने लग्नातील फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘कुलवधू’, ‘मोलकरीण बाई’ अशा गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री सुप्रिया पाठारे घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
सुप्रिया पाठारे यांनी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘साधी माणसं’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करते. याशिवाय सुप्रिया पाठारेंनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांच्या लग्नातील छानसा असा फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन लिहिलं आहे.
हेही वाचा : “विराजसचं लेखक-दिग्दर्शक म्हणून…”, मृणाल कुलकर्णी यांची लेकासाठी खास पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाल्या…
सुप्रिया पाठारे यांची पोस्ट
लग्नातले क्षण….
लग्नानंतरचे सुरुवातीचे क्षण किती गोड असतात नाही! ते सगळे क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो, पुढे जाऊन पुन्हा पुन्हा बघण्यासाठी… पण, इतक्या वर्षांच्या सहवासात, संसाराच्या सहजीवनात, काळाच्या, जबाबदाऱ्यांच्या ओघात… प्रेमाचे अन् संसाराच्या सुरुवातीचे हे क्षण बघणं राहूनच जातं.एक फोटो सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करून टाकतो. पोटात पुन्हा तोच गोळा येतो. प्रेमाची फुलपाखरं अवतीभोवती घिरट्या घालू लागतात. बॅकग्राऊंडला ‘पेहेला नशा पेहेला खुमार’चा piano ऐकू येतो आणि ओठांवर इतकंच येतं… ‘पाहिले न मी तुला’
अभिनेत्री सुप्रिया पाठारेंनी ( Supriya Pathare ) ही पोस्ट ‘पाहिले न मी तुला’ या लवकरच रंगभूमीवर येणाऱ्या नाटकाच्या निमित्ताने लिहिली आहे. लग्नाच्या फोटोमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. हिरवी साडी, गळ्यात हार-मंगळसूत्र, नाकात नथ असा मराठमोळा लूक सुप्रिया पाठारेंनी लग्नात केला होता.
सुप्रिया यांच्या फोटोवर मराठी कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अंशुमन विचारे, रेश्मा शिंदे, उर्मिला, हर्षदा खानविलकर, मेघना एरंडे या कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्री व त्यांच्या पतीचं कौतुक केलं आहे.