लोकप्रिय मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पाठारे नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यांच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री त्यांच्या लेकाला हॉटेल व्यवसायात सहकार्य करतात. काही महिन्यांपूर्वी सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने आईपेक्षा वेगळं क्षेत्र निवडत फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. मिहिर पाठारेने ठाण्यात ‘महाराज’ पावभाजी हे हॉटेल सुरु केलं आहे. या नव्या हॉटेलची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून आतापर्यंत मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी या हॉटेलला भेट दिली आहे.
हॉटेल सुरू केल्यानंतर दोन महिन्यांतच सुप्रिया पाठारे यांना मातृशोक झाल्याने त्यांनी मध्यंतरी काही दिवस त्यांचं हॉटेल बंद ठेवलं होतं. त्यानंतर खवय्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ३ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा ‘महाराज’ हॉटेल सुरू केलं. याबद्दल सोशल मीडिया पोस्ट शेअर करून सुप्रिया पाठारेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. परंतु, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : ‘झी मराठी’वरील ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या वेळेत पुन्हा होणार बदल, कारण…
हॉटेलमधील पावभाजी खातानाचा व्हिडीओ शेअर करत “काही अडचणींमुळे पुन्हा आपलं महाराज बंद आहे, लवकरच खवय्यांसाठी हजर होऊ, स्वामींचरणी हीच प्रार्थना, भेटूया लवकरच…” असं सुप्रिया पाठारे यांनी याच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा महाराज हॉटेल काही काळ बंद असणार याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमधील दोन दमदार स्पर्धक जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…
दरम्यान, जुलै महिन्यात सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ‘महाराज’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर हे नवीन हॉटेल सुरु केलं होतं. मिहिर हा प्रोफेशनल शेफ असून यापूर्वी त्याचा ठाण्यात ‘महाराज’ पावभाजी फूड ट्रक होता. या फूड ट्रकचं रुपांतर आता हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. याशिवाय सुप्रिया पाठारेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्या महत्त्वाची भूमिका साकारत असलेल्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.