कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्याच गायकांनी आपल्या सुंदर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. नुकताच ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पाडला. यामधील स्पर्धकांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवलं. अंतिम भागात स्पर्धकांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित व त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने असे दिग्गज कलाकार आले होते.
‘सूर नवा ध्यास नवा’चं हे पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आलं होतं. तीन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर नुकताच या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या महाअंतिम सोहळ्यात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजयी ठरला. स्पर्धेतील उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’च्या महाअंतिम सोहळ्यात कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार सहभागी झाले होते. टॉप ६ स्पर्धकांपैकी अकोल्याच्या गोपाळने गावंडेने विजेतेपदावर नाव कोरलं. याशिवाय या स्पर्धेत अंतरा कुलकर्णी प्रथम उपविजेती व अनिमेश ठाकूर द्वितीय उपविजेता ठरला आहे.
हेही वाचा : १६ वर्षांच्या अबोल्यानंतर शाहरुख खानशी गळाभेट, भांडणाबाबत सनी देओल म्हणाला, “अभिनेता म्हणून…”
“‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये मी स्पर्धक म्हणून सहभागी झालो तेव्हा या पर्वात विजेता होईल असं कधीच वाटलं नव्हतं. हा तीन महिन्यांचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. आताचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही” असं विजेत्या गोपाळने सांगितलं. दरम्यान, आता ‘सूर नवा ध्यास नवा’ने निरोप घेतल्यावर पुढचा कोणता नवा कार्यक्रम कलर्स मराठीवर सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.