Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा सूरज चव्हाण (Suraj Chavan) विजेता ठरला आहे. या विजयानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे. याबरोबरच अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) उपविजेता ठरला आहे.
काय म्हणाला सूरज चव्हाण?
एका मुलाखतीत सूरज चव्हाणने अभिजीत सावंतबाबत वक्तव्य केले आहे. सूरज चव्हाणने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यावेळी पॅडीदादाच्या तू फार जवळ होतास, त्याच्याबरोबर आणखी कोण तुझ्या जास्त जवळ होतं? यावर उत्तर देताना सूरजने म्हटले, “तिथे असलेले सर्वच स्पर्धक माझे कुटुंब आहे. मी कोणावर नाराज नाही, तिथेपण नव्हतो आणि इथेपण नाही. निक्कीसुद्धा मला जवळची आहे. अंकिताताईसुद्धा मला समजाऊन सांगायची.”
पुढे तो म्हणतो, “अभिदादानेदेखील मला खूप सांभाळून घेतलं. एवढा मोठा गायक, हिंदी गायक त्याच्याबरोबर काम करायची, बिग बॉसच्या घरात राहायची संधी मिळाली. त्याने मला खूप जीव लावला. खूप सांभाळून घेतलं. त्याचा स्वभाव खूप भारी आहे. तो मला म्हटलेला, तू आहेस तसा वाग. तुला कळत नाही, असं कशाला वागतो. तुला समजतं सगळं, तसं खेळ तू,”,असे तो मला प्रोत्साहन देत होता. सूरजने अशा प्रकारे अभिजीत सावंतचे कौतुक केले आहे.
हेही वाचा: Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”
दरम्यान, ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतनेदेखील सूरजचे कौतुक केले आहे. एक स्पर्धक म्हणून मला माझ्यासाठी वाईट वाटले, पण सूरजसाठी मी आनंदित आहे; कारण तो एक चांगला स्पर्धक आहे. मी एक स्पर्धा जिंकून आलेलो आहे, मी बघितलं आहे सगळं. मला आवडेल मी ज्या गोष्टी बघितल्यात, त्या सूरजनेसुद्धा बघाव्यात आणि मी त्याच्यासाठी खूप खूश आहे”, असे म्हणत सूरजसाठी आनंदित असल्याचे अभिजीतने म्हटले आहे.
सूरज जिंकल्यानंतर बिग बॉसच्या आधीच्या पर्वातील सदस्य आणि गायक उत्कर्ष शिंदेने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. महत्वाचे म्हणजे, त्याच्यासाठी गाणे तयार केले आहे. उत्कर्ष शिंदे पाचवा सीझन सुरु झाल्यापासून सातत्याने स्पर्धकांच्या खेळावर व्यक्त होत होता. चांगले खेळणाऱ्यांचे कौतुक करत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.