Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे सूरज चव्हाण हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालं. अवघ्या ७० दिवसांत मोढवे गावच्या या सुपुत्राने सर्वांना आपलंसं केलं. सूरज सर्वात आधी टिकटॉकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता. यानंतर तो रील्सकडे वळला. सूरजला त्याचे काही व्हिडीओ पाहून सुरुवातीच्या काळात प्रचंड ट्रोल केलं जायचं. पण, ‘बिग बॉस’मुळे हळुहळू सगळेजण त्याचे चाहते झाले.
सूरज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर आला आहे. बालपणी आई-बाबांचं छत्र हरपल्यावर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. परिणामी त्याला आपलं शिक्षण सुद्धा अर्धवट सोडावं लागलं. शाळा सोडल्यामुळे सूरजला आर्थिक व्यवहारातील काही गोष्टी आजही समजत नाहीत. याचा फटका बसून त्याला अनेकदा फसवणुकीचा सामना देखील करावा लागला आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात असताना पंढरीनाथ, अंकिता यांनी सूरजला खंबीरपणे साथ देत त्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं होतं.
सूरजने सुद्धा ट्रॉफी जिंकून गावी परतल्यावर सर्वात आधी गावच्या शाळेत गेला होता. गावच्या शाळेत जाऊन त्याने मुलांशी संवाद साधला होता. आज पुन्हा एकदा हा ‘गुलीगत किंग’ वसेवाडी जवळच्या एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सर्व मुलांची भेट घेण्यासाठी गेला होता. यावेळी सूरजने सर्व मुलांना लाखमोलाचा सल्ला देत सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.
सूरज या व्हिडीओमध्ये म्हणतो, “काय मग बरंय ना? चांगलं शिकताय, अजून मोठं व्हायचंय. खूप शिक्षण घ्या. मला जमलं नाही शिक्षण घ्यायला पण, तुम्ही असं करु नकात, खूप शिक्षण घ्या. खूप मोठे व्हा. मी कसा ‘बिग बॉस किंग’ झालो ‘झापुक झुपूक’ करून… तसे तुम्ही पण पुढे जा पण, शिक्षण घेऊन मोठे व्हा.”
सूरजने विद्यार्थ्यांना दिलेला हा सल्ला ऐकून सर्वजण त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. “लाखमोलाचं बोलून गेलास…शिकाल तर टिकाल”, “सूरज तू लोकांचं मन जिंकलं आहेस” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
दरम्यान, आता ‘बिग बॉस’ गाजवल्यावर सूरज चव्हाण मराठी कलाविश्वात मुख्य हिरो म्हणून पदार्पण करणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे.