Suraj Chavan : आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यावर हिच इच्छा सूरज चव्हाणने सर्वांसमोर बोलून दाखवली होती. यानंतर या ‘गुलीगत किंग’ने विजेतेपदावर नाव कोरलं. ट्रॉफी जिंकून गावात आल्यावर सूरजचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण, यादरम्यान काही करून हक्काचं घर बांधायचं हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. मोढवे गावी परतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला भेटीसाठी आमंत्रण दिलं होतं. या दोघांमध्ये भेट झाल्यावर अजित पवारांनी सूरजला लवकरात लवकर घर बांधून द्या अशी सूचना दिली.
अजित पवारांनी घोषणा केल्यावर सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा लगेच पार पडला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सूरजने “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी ( अजित पवार ) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” असं सांगत त्यांचे आभार मानले होते. यानंतर गेल्या महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे सूरज चव्हाणने आज मंत्रालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
हेही वाचा : Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
अजित पवारांची भेट घेतल्यावर सूरज चव्हाण काय म्हणाला?
सूरज या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “दादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला त्यांना भेटायचं होतं. कधी एकदा त्यांना भेटायला येतो असं झालं होतं आणि घराबद्दल सांगायचं झालं तर, सध्या घराचं काम जोरात सुरू आहे. दादा सांगतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा! ते उपमुख्यमंत्री झालेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो.”
सूरजला यानंतर आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “माझी कामं सुरूच आहेत. मोठमोठी काम चालू झालीयेत… याबद्दल तुम्हाला हळुहळू समजेलच. याशिवाय ‘झापुक झुपूक’ सिनेमा सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे. मग तेव्हा भेटूच आपण”
हेही वाचा : ५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण याने आज मंत्रालयात माझी सदिच्छा भेट घेतली.@starsurajchavan pic.twitter.com/op0yqazw2h
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 9, 2024
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सूरज चव्हाण ( Suraj Chavan ) घराघरांत पोहोचला. ७० दिवसांत त्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. याशिवाय घरातील अन्य सदस्यांनी सुद्धा त्याला चांगला पाठिंबा दिला.