Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून सूरज चव्हाण घराघरांत लोकप्रिय झाला. गेली ३-४ महिने या ‘गुलीगत किंग’ला महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळालं आणि याची पोचपावती म्हणून यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरजने स्वत:चं नाव कोरलं. ट्रॉफी जिंकल्यावर सूरज सर्वात आधी जेजुरीच्या खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. यानंतर त्याने मोढवे गावात एन्ट्री घेतली. ‘बिग बॉस’ विजेत्या सूरजचं यावेळी सर्वांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं होतं. मात्र, या सगळ्यात त्याच्या मनात फक्त स्वत:चं हक्काचं घर बांधावं हा विचार सुरू होता.

सूरजने ( Suraj Chavan ) लहानपणापासून अतिशय बेताच्या परिस्थितीत दिवस काढले आहेत. आई-वडिलांचं छत्र हरपल्यावर सूरजची आत्या आणि बहिणींनी त्याचा सांभाळ केला. आठवीपर्यंत शिक्षण केल्यावर त्याने शाळा सोडली. हळुहळू तो टिकटॉकवर व्हिडीओ करून लोकप्रिय झाला. त्यानंतर टिकटॉक बंद झाल्याने सूरजने आपला मोर्चा इन्स्टाग्रामकडे वळवला. इन्स्टाग्रामवर देखील त्याच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. यादरम्यान, सूरजच्या साधेपणाचा फायदा घेऊन त्याची अनेकांनी फसवूक केल्याचं त्याने ‘बिग बॉस’च्या घरात सांगितलं होतं. याशिवाय आता हक्काचं घर बांधणार असं देखील सूरज म्हणाला होता. आता या महत्त्वाच्या स्वप्नाच्या दिशेने सूरजने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

हेही वाचा : वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा

‘बिग बॉस’नंतर सूरजचा ( Suraj Chavan ) चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. एवढंच नव्हे तर शो संपल्यावर सूरजला भेटण्यासाठी अजित पवार यांनी बोलावलं होतं. या भेटीदरम्यान, त्यांनी लवकरच सूरजला घर बांधून द्या अशा सूचना दिल्या होत्या. याचबरोबर त्याच्या कुटुंबीयांची देखील विचारपूस केली होती. अजित पवारांनी घोषणा केल्यावर आता ‘गुलीगत किंग’चं घराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. नुकताच सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याचा व्हिडीओ त्याने युट्यूबवर शेअर केला आहे.

सूरजने मानले अजित पवारांचे आभार

नव्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यावर सूरज चव्हाण माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी ( अजित पवार ) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. दादांनी मला दसऱ्याला घराबद्दल सांगितलं होतं आणि आज मी माझ्या हस्ते भूमिपूजन केलं. खूप बरं वाटतंय. दादांनी गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.”

हेही वाचा : पाठकबाईंचं पुनरागमन! अक्षया देवधर ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार, सोबतीला असेल ‘हा’ अभिनेता

दरम्यान, सूरजच्या ( Suraj Chavan ) चाहत्यांनी त्याला या नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सूरज लवकरच आता ‘झापुक झुपूक’ या केदार शिंदे दिग्दर्शित मराठी सिनेमात झळकणार आहे.