Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेत आला आहे. या ‘गुलीगत किंग’ने यंदाच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यावर सर्वत्र जल्लोष करण्यात आला. सूरजने शोमध्ये प्रवेश केल्यावर सर्वांना ठामपणे “मी शेवटी आलोय आणि शेवटी जाणार, ट्रॉफी मीच जिंकणार” असं सांगितलं होतं. याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा आपल्या चाहत्यांवर असणार विश्वास! सूरज त्याच्या विजयाचं संपूर्ण श्रेय चाहत्यांना आणि देवाला देतो. त्यामुळे मुंबईत सिद्धिविनायक आणि त्यानंतर जेजुरीत खंडोबाचं दर्शन घेऊन सूरज आपल्या मोढवे गावात परतला.
सूरजचं ( Suraj Chavan ) गाव बारामतीमधील मोढवे येथे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावकऱ्यांनी आणि तमाम चाहत्यांनी त्याला भरपूर पाठिंबा दिला. याची पोचपावती म्हणून सूरजने यंदाच्या ट्रॉफीवर स्वत:चं नाव कोरलं आहे. सूरजने ट्रॉफी जिंकल्यावर त्याच्या कुटुंबीयांना देखील प्रचंड आनंद झाला होता. त्याच्या गावात ग्रँड फिनालेच्या दिवशी देखील जल्लोष करण्यात आला होता.
हेही वाचा : Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन गावच्या शाळेत पोहोचला सूरज चव्हाण! म्हणाला, “बाळांनो शिक्षण घ्या, मी गरीब होतो पण…”
सूरजला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
सूरज मंगळवारी सायंकाळी मोढवे गावात पोहोचला. यावेळी त्याच्या स्वागतासाठी गावात जय्यत तयारी करण्यात आली होती. गुलालाची उधळण करून गावकऱ्यांनी सूरजची विजयी मिरवणूक काढली. सूरज गावी गेल्यावर पहिला त्याच्या शाळेत गेला तिथे विद्यार्थ्यांना त्याने भरपूर शिक्षण घ्या असा मोलाचा सल्ला दिला. यानंतर गावकऱ्यांनी सूरजचा सत्कार केला. शेवटी सूरज प्रचंड दमला होता. ७० दिवसांनी चाहत्यांची गर्दी, मिळणारं प्रेम पाहून साध्या स्वभावानुसार त्याने सर्वांची भेट घेतली, फोटो काढले शेवटी तो प्रचंड थकला आणि सर्वांसमोर त्याला भोवळ आली.
सूरजला ( Suraj Chavan ) चाहत्यांसमोरच चक्कर आल्याने सगळेच चिंतेत पडले. त्याच्या दोन मित्रांनी त्याला गर्दीतून बाहेर काढत दूर नेलं. तिथेही सगळे चाहते सूरजच्या मागे काळजीपोटी धावत गेल्याचं पाहायला मिळत आहे. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सूरजला ( Suraj Chavan ) भोवळ आल्याच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याच्या सर्व चाहत्यांना काही दिवस शांतता घ्या, तो दमलाय गर्दी करू नका असं आवाहन केलं आहे. दरम्यान, गावचा सत्कार सोहळा पार पडल्यावर सूरज पुन्हा एकदा कामानिमित्त मुंबईच्या दिशेने रवाना झाला.